अकरावीच्या विशेष फेरीकडे विद्यार्थ्यांची पाठ; ६८ हजारांपैकी ५९ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश

मुंबई : अकरावीची विशेष प्रवेश फेरीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटला असून तिसऱ्या प्रवेश फेरीपर्यंत असलेली अटीतटी ओसरली आहे. विशेष फेरीनंतर मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. अकरावीच्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ६८ हजार विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे.

अकरावीच्या तीन प्रवेश फे ऱ्यांमध्ये नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी अटीतटी होती. ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही हवे ते महाविद्यालय मिळू शकले नाही. तिसऱ्या फेरीनंतर जवळपास ७० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. उपलब्ध जागांपेक्षाही विद्यार्थ्यांचे अर्ज अधिक होते. वाणिज्य शाखेसाठी उपलब्ध जागांपेक्षा दहा हजार अर्ज अधिक होते. मात्र, तुलनेने विशेष प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल अधिक लागूनही महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहणार आहेत.

सर्व शाखांच्या मिळून एकूण १,४८,३८६ जागा (कोटा वगळून) विशेष फेरीसाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी ६८ हजार १७८ विद्यार्थ्यांनीच अर्ज केला. त्यातील ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले असून ८ हजार ८५६ विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. या फेरीत अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला तर ८९ हजार ४४ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. विशेष फेरीत ३५ हजार ३१४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. या फेरीतही प्रवेश न मिळालेले किंवा प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एका फेरीचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या फेरीपर्यंत झालेले प्रवेश

शाखा         उपलब्ध जागा   कोटा आणि तीन फेऱ्यांतील मिळून प्रवेश 

कला                  ३७ हजार ३००                  १४ हजार २८३

वाणिज्य            १ लाख ७३ हजार ५२०       ७४ हजार ९६२

विज्ञान              १ लाख ३ हजार ९१०         ४४ हजार ७१३

एचएसव्हीसी     ५ हजार ६६०                   १ हजार ५०८

एकूण                ३ लाख २० हजार ३९०     १ लाख ३५ हजार ४६६