सार्वजनिक बांधकाम विभागातील आणखीन एक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या कचाटय़ात सापडला आहे. बुधेश रंगारी असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ते पनवेल येथे मार्ग विकास विभागाच्या कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. ठेकेदारांनी केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ७३ हजार रुपयांची लाच घेताना बुधेश रंगारी यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. रंगारी याच्या खारघर येथील फ्लॅटमध्ये तब्बल १ कोटी २८ लाख रुपये सापडले असून बेलापुरातील एका बँकेत असलेले त्याचे लॉकर सील करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असताना रायगड जिल्ह्य़ात सापडलेला हा तिसरा लाचखोर आहे. या संदर्भात नवीन पनवेल येथील एका ठेकेदाराने तक्रार दिली होती. हा ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाकडील लहान-मोठय़ा बांधकामांचे ठेके घेत होता.