27 November 2020

News Flash

‘ती फुलराणी’च्या नव्या प्रयोगात संहितेची मोडतोड!

पुलंच्या मूळ संवादांत बदल; नाटय़रसिकांत नाराजी

पुलंच्या खासगी नोंद वहीतील ही एक नोंद. नाटककाराच्या शब्दाचे महत्त्व सांगणारी. इब्सेन या जगविख्यात नाटककाराचे वाक्य त्यांनी उद्धृत केले आहे. ते असे - माझ्या संवादातला जर एक शब्द तुम्ही इकडला तिकडे केलात, तर ‘माय ड्रामा विल ब्लीड’ - माझ्या वाक्यांना रक्त फुटेल. 

पुलंच्या मूळ संवादांत बदल; नाटय़रसिकांत नाराजी

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘ती फुलराणी’ नाटकाचा नवा प्रयोग संहितेपेक्षा वेगळाच होत असल्याची बाब ध्यानात आल्यामुळे नाटय़रसिकांमध्ये नाराजीची भावना आहे. पुलंचे मानसपुत्र आणि जागतिक कीर्तीचे गणितज्ञ दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांनी आपल्या भारतभेटीत हे नाटक पाहिले. त्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना नाटकाच्या नव्या रूपाला आक्षेप घेत, हे नाटक पाहताना विरस होत असल्याचे मत व्यक्त केले.

तर, नाटक हे नाटककाराचे माध्यम आहे ही बाब प्रयोग करण्यापूर्वी दिग्दर्शक आणि कलाकारांनी ध्यानात घ्यायला हवी, असे सांगत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी अशा स्वरूपाची मोडतोड अनैतिक असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नाटकाच्या मूळ संहितेमध्ये कोणताही बदल केला नसल्याचा दावा दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी केला आहे. पुलंच्या लेखनकौशल्यामुळे ‘ती फुलराणी’ हे नाटक गेल्या तीन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या स्मरणात आहे. आता हे नाटक नव्या संचात आले असून, त्यामध्ये हेमांगी कवी आणि डॉ. गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुलं आणि सुनीताबाई यांनी पुलंच्या सर्व नाटकांच्या प्रयोगाचे हक्क कलाकारांसाठी खुले केले असल्यामुळे कॉपीराइट कायदा लागू होत नाही. हे वास्तव असले तरी पुलंच्या संहितेनुसार प्रयोग व्हावेत ही अपेक्षा अवास्तव नाही. असे असताना ‘ती फुलराणी’ नाटकातील बदल रसिकांना सुखावणारा नाही हे रसिकांकडून आलेल्या तक्रारींवरून स्पष्ट होते. या नाटकाच्या सादरीकरणातील बदलांबाबत ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर म्हणाले, की फार्सिकल करण्याच्या नादामध्ये ती फुलराणी नाटकाचा तोल बिघडला आहे. हे नाटक मूळ संहितेनुसार होत नसल्याचे समजले तेव्हा जाणीवपूर्वक हा प्रयोग पाहिला. हेमांगी कवी यांनी काम चांगले केले आहे. मात्र, विक्षिप्तपणा करून टाळ्या मिळविण्याचे प्रकार खटकण्याजोगेच आहेत. हे नाटक शब्दांवरचे आहे. पण, पुलंचे शब्द काढून काही ठिकाणी वेगळेच संवाद घुसडण्यात आले आहेत. गरज नसलेले संवाद आल्यामुळे ज्यांना शब्दांचे महत्त्व समजते त्यांचा विरस होतो. तुम्हाला पुलंचे शब्द नको असतील तर नव्याने नाटक लिहून घ्या आणि ते करा. मात्र, फुलराणी नाटकाबाबत जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे, असेही ठाकूर म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:12 am

Web Title: p l deshpande ti phulrani marathi play
Next Stories
1 शासनाविरोधात बालगृह चालकांचे दबावतंत्र
2 तिसऱ्या फेरीत सुमारे १० हजार विद्यार्थी बाहेर
3 झाकिर नाईकचे दिग्विजय सिंह यांच्याकडून उघड समर्थन!
Just Now!
X