मुंबई: स्वातंत्र्योत्तर भारतीय चित्रकलेत महत्त्वाचे योगदान देणारे आणि आध्यात्मिक साधेपणा जपणारे ख्यातनाम चित्रकार अकबर पदमसी (वय ९२ यांचे ) सोमवारी कोइम्बतूरनजीक निधन झाले. वरळीला वास्तव्यास असलेले पदमसी, हवापालटासाठी  कोइम्बतूरजवळील एका आश्रमात राहात असत. मृत्युसमयी त्यांच्या कलाभ्यासक पत्नी भानु त्यांच्याबरोबर होत्या.

पदमसी यांची चित्रकारकीर्द १९५१  पासून बहरत गेली. मुंबईच्या ज. जी. कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण करून पॅरिसला उच्चशिक्षणासाठी गेलेले पदमसी पाश्चात्त्य शैलीनेच चित्रे रंगवत . त्यांच्या एका नग्नचित्रासाठी त्यांच्यावर खटला भरला गेला , तेव्हा ‘‘ शिक्षा भोगेन पण मी माझ्या चित्राला कदापिही अश्लील मानणार नाही ‘‘ असा बाणा त्यांनी दाखवला होता.

वॉर्डन रोडच्या भुलाभाई इन्स्टिट्यूटमध्ये  हुसेन, गायतोंडे यांसारखे चित्रकार, इब्राहीम अल्काझींसारखे दृश्यकलाप्रेमी नाट्यगुरू यांच्या सहवासात त्यांनी काही काळ स्टुडिओ थाटला,  याच काळात तय्यब मेहता, बाल छाबडांसारखे मित्र त्यांना मिळाले.  इथेच बॉम्बे ग्रूपची मेढ रोवली गेली.

१९६० मध्येच अकबर पदमसींनी आकडे, त्यांची  रचना  यांवर आघारित पूर्णत: अमूर्त फिल्मही केली होती. मेटास्केप ही अमूर्ताकडे झुकणारी निसर्गचित्र मालिका, पांढऱ्या प्रतलावर एकाच रंगछटेत केलेली गांधी ही मालिका तसेच अन्य मनुष्यचित्रे ही त्यांची स्मरणीय कलासंपदा.

ललित कला अकादमीचा कलारत्न पुरस्कार (२००४) , मध्य प्रदेशचा कालिदास सम्मान ( १९९८) मिळालेल्या पदमसींना पद्म पुरस्काराने मात्र हुलकावणी दिली. अनेक लिलावांमधून त्यांची चित्रे आजही असतात.

प्रोग्रेसिव्ह ग्रूपनंतरचे महत्त्वाचे चित्रकार अशी पदमसी यांची ख्याती आहे. चित्र काढण्याच्या क्रियेला ते ध्यानासारखा आध्यात्मिक अनुभव मानत. गीता ,  भारतीय सौंदर्यशास्त्र यांचा अभ्यास असणारे पदमसी स्वत:वरही नर्मविनोद करू  शकत असत, अशा आठवणी त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्या.