एक वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने व्यथित झालेल्या पालकांना कासारवडवली पोलिसांनी दुसऱ्याची मुलगी दिल्याचा धक्कादायक प्रकार डीएनए चाचणीतून उघडकीस आला आहे. पोलिसांच्या या चुकीमुळे या मुलीला आपल्या खऱ्या पालकांपासून तब्बल एक महिना दूर राहावे लागले असून, मुलगी पळविल्याच्या आरोपाखाली तिच्या वडिलांना तरुंगात जावे लागले आहे. त्यामुळे कासारवडवली पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी आता अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.
घोडबंदर परिसरात राहणाऱ्या मंजू प्रजापती या एक वर्षीय मुलीला वर्षभरापूर्वी पळवून नेण्यात आले असून, याप्रकरणी २० ऑगस्ट २०१३ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. या मुलीच्या शोधासाठी पाठपुरावा करूनही पोलिसांना तिचा शोध लागत नव्हता. यासंबधी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राजकीय नेत्यांना पत्र पाठवूनही तिच्या शोधासाठी हालचाली होत नव्हत्या. त्यामुळे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे पोलिसांनी १८ जुलैला दोन वर्षीय मुलीला न्यायालयात हजर करून ती मंजू असल्याचा दावा केला होता. तसेच ११ टीममार्फत तातडीने तपास केल्याचे सांगत त्या मुलीला पालकांच्या ताब्यात दिले होते. मात्र, ही आपली मुलगी नसल्याचे पालकांचे म्हणणे होते. त्यामुळे पालकांच्या वकिलांनी केलेल्या आग्रहाच्या आधारे न्यायालयाने डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते.
त्यामध्ये पालकांचे म्हणणे खरे ठरले असून, ती मुलगी त्यांची नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ती मुलगी प्रजापती यांची असल्याचा दावा करत पोलिसांनी तिच्या वडिलांना मुलगी पळविल्याच्या आरोपाखाली अटक केली असून, ते कारागृहात बंदिस्त आहेत, अशी माहिती आम आदमी पार्टीचे नेते संजीव साने यांनी दिली.
या प्रकरणात नितीन जस्वानी यांनी लक्ष घातले आणि अ‍ॅड. राहुल शेळके यांनी तक्रारदारांची बाजू उच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडल्यामुळे ही घटना समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून काढून सीबीआयकडे देण्याची मागणी त्यांनी केली आहे.