मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून पाìकगसाठीच्या जागेत पुरेशी वाढ करण्यासह एकात्मिक वाहनतळ व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने मोकळ्या जागांबाबतच्या सध्याच्या धोरणाचे कोणतेही उल्लंघन न करता वाहनतळ उभारण्यासाठी करावा तसेच पर्यायी जागांचाही शोध घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबई महापालिकेस दिले.
 मुंबई आणि ठाणे शहरातील वाहतुकीच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी आयोजित बठकीत बोलताना फडणवीस यांनी हे आदेश दिले. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव गौतम चटर्जी, मुंबई पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान, गृहविभागाचे सचिव विनीत अग्रवाल आदी या वेळी उपस्थित होते.
 वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी यापुढे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात येईल. मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचा सुरक्षेसह वाहतूक नियंत्रणासाठीही उपयोग होईल. तसेच मुंबई शहरातील महत्त्वाच्या पॉइंटवर विशेष कॅमेरे बसविण्यात येतील. त्यामुळे सिग्नल तोडणे, स्टॉप लाइनच्या पुढे वाहने उभे करणे, वाहन बेदरकारपणे चालविणे आदी गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.