करोनाचा धोका वाढण्याची कामगार संघटनांना भीती

मुंबई : आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असला, तरी प्रवासी आणि एसटी कामगार संघटनांनी त्याला विरोध केला आहे. करोना संसर्गाचा धोका असल्याने आणखी काही काळ तरी पूर्वीप्रमाणेच ५० टक्के क्षमतेने फेऱ्या चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या मार्गावर तासन्तास प्रवास होतो. अशा वेळी प्रवासात अंतर नियम पाळायचे झाल्यास आंतरजिल्हा वाहतुकीत २२ प्रवाशांना परवानगी असायला हवी, असे मत गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी तोटय़ात आहे म्हणून प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार शासनाने उचलावा, अशी मागणी कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी केली. यासंदर्भात परिवहन मंत्री व एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चालक-वाहक, अभियांत्रिकी व अन्य कर्मचाऱ्यांना मुखपट्टय़ा, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात यावेत, चालक केबिनला प्लास्टिकचे पडदे असावे, प्रवाशांची व चालक-वाहकांची तपासणी केली जावी, वाहकाला संरक्षक अ‍ॅप्रॉन मिळावा अशा मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. परंतु, त्या पूर्ण न करता पूर्ण क्षमतेने गाडय़ा चालवून कर्मचाऱ्यांचा जीव आणखी धोक्यात टाकला जात आहे, अशी नाराजी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त के ली. सुरक्षा साधनांचा अजूनही तुटवडा असून त्याचा विचार झाला पाहिजे, असे महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

३२ हजार प्रवाशांची भर

१७ सप्टेंबपर्यंत आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत एसटी प्रवासी वाहतूक ५० टक्के प्रवासी क्षमतेनेच होत होती. त्या वेळी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ लाख ९० हजार ७३८ होती. यासाठी ४ हजार ४१० बसच्या १६ हजार ३४७ फेऱ्या चालवण्यात आल्या. तर १८ सप्टेंबरला ४ हजार ५६५ बसच्या १६ हजार ९०४ बस फेऱ्या चालवल्याने ५ लाख २२ हजार १८४ प्रवाशांनी प्रवास के ला. म्हणजेच ३२ हजार प्रवाशांची भर पडली.