मुंबई : सामाजिक अंतरासोबतच मुखपट्टीचा वापर सक्तीचा असतानाही करोनाविषयक नियम सर्रास धाब्यावर बसविण्यात येत असून रिक्षा, टॅक्सी, बसमधून प्रवास करणारे प्रवासी मुखपट्टीविना प्रवास करताना दिसत आहेत. करोनाविषयी मनात असलेली भीती काहीशी दूर झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना पायदळी तुडविल्या जात आहेत.

शीव, दादर, माटुंगा, परळ परिसरांत पाहणी केली असता पाच टॅक्सीचालकांमागे केवळ एकच चालक मुखपट्टीचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. बहुतांशी चालक मुखपट्टीचा अयोग्य पद्धतीने वापर करीत असल्याचे आढळले. केवळ चालकच नाही तर प्रवाशांमध्येही तेवढीच बेफिकिरी दिसून आली. ‘करोना संसर्गाची पूर्ण कल्पना आहे; पण आता पहिल्यासारखी भीती वाटत नाही. मुखपट्टीमध्ये जीव गुदमरण्यापेक्षा जे व्हायचे आहे ते होऊ दे’ अशी प्रतिक्रिया टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने व्यक्त के ली. चालकानेही याच मताला दुजोरा दिला. ‘करोना आता उरलेला नाही. त्यामुळे बिनधास्त फिरायचे. शेअर टॅक्सीचालकांना मुखपट्टीची सक्ती नाही,’ असे माटुंगा पश्चिम येथील एका टॅक्सीचालकाने बेदरकारपणे सांगितले.

धारावी, वांद्रे, खार, वाकोला, सांताक्रूझ परिसरांतही हेच चित्र पाहायला मिळाले. चालकाकडे मुखपट्टी नसेल तर प्रवाशांनी त्यांना सूचना करणे अपेक्षित असते; परंतु ‘तीही माणसेच आहेत. त्यांनाही त्रास होतो. त्यामुळे मुखपट्टी नाही वापरली तरी चालेल’ अशा शब्दांत एका प्रवाशाने रिक्षाचालकाची पाठराखण केली. कुर्ला परिसरातील एका रिक्षाचालकाने सांगितले की, ‘आम्ही सतत गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करतो. त्यामुळे थुंकण्यासाठी मुखपट्टी वारंवार खाली घ्यावी लागते. त्यामुळे हल्ली आम्ही मुखपट्टी वापरत नाही,’ असेही एका चालकाने सांगितले.

बेस्टचे वाहक मुखपट्टीचा वापर करताना दिसले. काही ठिकाणी चालक मुखपट्टीविना होते, परंतु ते क्वचितच. प्रवासी मात्र कोणतीही भीती न बाळगता विनामुखपट्टी प्रवास करताना दिसले. ‘प्रवाशांना आम्ही सूचना केलेल्या आवडत नाही. काही वेळा प्रवासी हुज्जत घालतात,’ असे आणिक आगारातील बेस्टच्या एका वाहकाने सांगितले.

क्लिन-अप मार्शलशी वाद

धारावी आणि वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यानच्या टी जंक्शन सिग्नलवर पालिकेच्या क्लिन-अप मार्शल कारवाईसाठी तैनात आहेत; परंतु मुखपट्टीविना प्रवास करणारे प्रवासी मात्र या कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक देतात, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. ‘लोकांकडे पैसे नसतात. कुणी राजकीय नेत्यांची ओळख सांगतात, तर कुणी आमच्या ओळखपत्राचे फोटो काढून घेऊन जातात,’ अशी व्यथा कर्मचारी भास्कर पिल्ले यांनी मांडली.