राज्यात करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर झाला असून, मुंबई आणि परिसरात रविवारी करोनाचे १०३ रुग्ण आढळले. मुंबईत करोनाने रविवारी आठ बळी घेतले. त्यामुळे मुंबईतील करोनाबळींची संख्या ३० वर गेली असून, राज्यातील मृतांचा आकडा ४५ वर पोहोचला.

राज्यातील रुग्णसंख्या ७४८ झाली. मुंबईत रविवारी आढळलेल्या १०३ नव्या रुग्णांपैकी ५५ जणांची तपासणी खासगी प्रयोगशाळांत करण्यात आली होती. त्यांच्या चाचण्यांवर कस्तुरबा रुग्णालयाने रविवारी शिक्कामोर्तब केले. रविवारी मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांना दिर्घकालीन आजार होता. या सर्व मृतांचे वय ५२ ते ७७ वष्रे यादरम्यान होते. रविवारी राज्यात करोनाने १३ बळी घेतले. त्यामुळे राज्यातील करोनाबळींची संख्या ४५ वर पोहोचली.

देशातील रुग्णसंख्या ३३७४

गेल्या चोवीस तासांत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४७२ ने वाढ झाली असून, देशभरात एकूण रुग्णसंख्या ३३७४ वर पोहोचली आहे. देशात एकूण ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण ४.१ दिवस आहे. तबलिग अनुयायांमुळे रुग्णांची संख्या वाढली, अन्यथा रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण ७.४ दिवस इतके राहिले असते, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

७५ लाख गरजूंना जेवण

देशभरात स्थलांतरित मजूर आणि गरिबांना जेवणाची सुविधा व निवारा पुरवला जात आहे. २७ हजार ६६१ तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये १२ लाख ५० हजार गरजूंची राहण्याची सोय करण्यात आली आहे. १९ हजार ४६० खाद्यान्न केंद्रांमध्ये ७५ लाख लोकांच्या जेवण्याची व्यवस्था होते. विविध कंपन्यांनी आपापल्या १३ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांची राहण्याची व जेवण्याची सोय केलेली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहसंयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.

एन-९५ मास्क, पीपीई विक्री-वितरणावर निर्बंध

मुंबई : एन-९५ मास्क आणि पीपीई यांच्या विक्री, वितरण आणि दरांवरही राज्य सरकारने शनिवारपासून निर्बंध लागू केले आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. करोना विषाणू फैलावाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात एन-९५, पीपीईची आवश्यकता आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या राज्यात अनेक विक्रेत्यांकडून या वैयक्तिक सुरक्षा साधनांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.