पालिकेच्या २८ सेवासुविधांचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध

महापालिकेने परवाने व प्रमाणपत्रांसाठी उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अर्जाना चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरात ९४ टक्के अर्ज व ९७ टक्के शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरले गेले. त्याआधीच्या वर्षांत हेच प्रमाण १३ टक्के होते. यातील सर्वाधिक अर्ज हे दुकानांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विवाह नोंदणीसंबंधी आहेत.

नागरी सेवासुविधा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन केल्या जात असून आतापर्यंत २८  सेवासुविधा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. हे सर्व अर्ज महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून यात प्रामुख्याने दुकानांचे परवाने, विवाह नोंदणी, चर खोदणे, आरोग्य परवाने, व्यवसाय परवाने, जाहिरात परवाने, नवीन कारखाना परवाना, जल जोडणी, अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र, शिक्षण खात्याशी संबंधित अर्ज, पाण्याचा टँकर, मृत्यू प्रमाणपत्र, नवरात्री व गणेशोत्सवसंबंधी परवानगी, चित्रीकरण परवानगी यांचा समावेश आहे. आधीच्या वर्षी म्हणजे २०१६-१७ मध्ये केवळ  ७४ हजार ५११ अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. या संख्येत यावर्षी १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल साडेचारपट वाढ झाली. या काळात ४ लाख १० हजार ५२५ जणांनी ऑनलाइन परवानगी /प्रमाणपत्र घेतली. याचदरम्यान ऑफलाइन अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली. ५ लाख ३ हजार ८३७ च्या तुलनेत या वर्षी केवळ २५ हजार ८६ जणांनी ऑफलाइन सेवा घेतली. तसेच या सेवासुविधांचे तब्बल ९७ टक्के शुल्क हे ऑनलाइन पद्धतीने, तर केवळ ३ टक्के शुल्क हे जुन्या पद्धतीने मिळाले आहे.

एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सर्वाधिक, २ लाख १२ हजार ३२३ ऑनलाइन अर्ज दुकान परवान्याच्या नूतनीकरणासाठी आले, तर ऑफलाइन अर्ज करणाऱ्यांची संख्या ३९ एवढी आहे. याखालोखाल नवीन दुकानाच्या नोंदणीसाठी १ लाख १२ हजार ४८९ ऑनलाइन अर्ज; तर याच कारणासाठी केवळ एक ऑफलाइन अर्ज प्राप्त झाला. विवाह नोंदणीसाठी ४९ हजार ६४९ ऑनलाइन अर्ज आले असून यासाठी एकही ऑफलाइन अर्ज आला नाही.