ऑगस्टमध्ये मुंबईत चार टक्के महिलांकडून घरखरेदी

मुंबई : राज्य सरकारने महिला घरखरेदीदारांना मुद्रांक शुल्क दरात एका टक्क्य़ाची सवलत जाहीर करून पाच महिने उलटले तरी महिला घर खरेदीदारांचा टक्का काही वाढताना दिसत नाही. एप्रिल माहिन्यात मुंबईत ६.६ टक्के असे महिला घर खरेदीदारांचे प्रमाण होते. ऑगस्टमध्ये हा आकडा ४ टक्क्य़ांवर आला. सरकारने ही सवलत दिल्यानंतरही महिला घर खरेदीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. मात्र यात काही त्रुटी असल्याने महिला ग्राहक पुढे येत नसल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून महिला दिनाचे औचित्य साधत मार्चमध्ये राज्य सरकारने राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर केली. या योजनेनुसार महिला घर खरेदीदारांना मुद्रांक शुल्क दरात एक टक्क्य़ांची सवलत देण्यात आली.

या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून सुरू झाली. या निर्णयामुळे घर खरेदीसाठी महिला पुढे येतील, कुटुंबातील महिलेच्या नावे घर नोंदणी करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र मागील पाच महिन्यांत घर खरेदीतील महिलांचा टक्का वाढला नसल्याची बाब नाइट फ्रँक या मालमत्ता बाजारपेठेतील सल्लागार कंपनीच्या अहवालातून समोर आली आहे.

एप्रिलमध्ये मुंबईत ६.६ टक्के महिलांनी घरखरेदी केली. त्यानंतर ही टक्केवारी वाढेल असे वाटत होते. पण मेमध्ये केवळ १.८ टक्केच महिलांनी घर खरेदी केले. त्यानंतर जूनपासून ऑगस्टपर्यंत महिला घर खरेदीदारांचा आकडा ३ ते ४ टक्क्य़ांदरम्यानच राहिला असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एका चांगल्या उद्देशाने हा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र केवळ एक टक्का सवलतीचा तितकासा फायदा होताना दिसत नाही.

त्यामुळे ही सवलत वाढवून दोन टक्के केली तर नक्कीच याचा चांगला परिणाम येत्या काळात दिसेल आणि महिला ग्राहक वाढतील, असा विश्वास नाइट फ्रँकच्या रिसर्च विभागाचे संचालक विवेक राठी यांनी व्यक्त केला.

पाच महिन्यांतील महिला घरखरेदीदारांची टक्केवारी

एप्रिल   : ६.६

मे :    १.८

जून :   ४.७

जुलै :   ३.०

ऑगस्ट :   ४.०