पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण असताना सलग १७ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल १४ तर डिझेल १५ पैशांनी महागलं आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८८.२६ रुपये प्रतिलिटर झला असून डिझेलचा दर ७७.४७ रुपये प्रतिलिटर झाला आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २३ पैशांची वाढ झाली होती. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून येथे तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने काँग्रेसकडून सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. अनेक पक्षांनी काँग्रेसच्या भारत बंदला समर्थन देत आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना झाल्याचंही समोर आलं.

दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र पेट्रोल ५५ रूपये दराने मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल कारखाना सुरू करणार आहे. त्याच्या मदतीने डिझेल ५० रूपये तर पेट्रोल फक्त ५५ रूपये मध्ये मिळेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

इंधनाचे दर कमी करणे सरकारच्या हाती नाही- भाजपा</strong>
इंधन दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. कच्च्या तेलाचे भडकलेले भाव याला कारणीभूत आहेत. आमच्या सरकारने महागाई कमी करण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. मात्र इंधनाचे वाढते दर सरकारच्या हातात नाहीत असे म्हणत भाजपाने हात झटकले आहेत. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सरकारची बाजू मांडताना हे वक्तव्य केलं होतं.