21 February 2019

News Flash

समुद्री कासवावर फिजिओथेरपी

समुद्री कासवांना मायक्रोचिप लावण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.

अक्षय मांडवकर, मुंबई

डहाणू येथील समुद्री कासवांच्या शुश्रूषा केंद्रात दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या ‘बच्चू’ नामक ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवावर फिजिओथेरपीने यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्याच्या पुढच्या पायाची हालचाल होत नव्हती. त्यामुळे ते तीन पायांवरच पोहत होते. पशुवैद्यकांनी गेल्या दोन महिन्यांत फिजिओथेरपीद्वारे विविध व्यायाम करून घेऊन या पायाला चालना दिली. ‘बच्चू’नेदेखील चांगला प्रतिसाद दिल्याने पाय कार्यान्वित झाला आहे. दोन आठवडय़ांत त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे.

डहाणू, पालघर आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जखमी अवस्थेत सापडणाऱ्या समुद्री कासवांवर डहाणूतील ‘सी-टर्टल ट्रीटमेंट अ‍ॅण्ड ट्रान्झिट सेंटर’मध्ये उपचार केले जातात. राज्यात सागरी कासवांवर उपचार करणारे हे एकमेव केंद्र आहे. उपचारांती प्रकृतीत  सुधारणा झालेल्या कासवांना पुन्हा समुद्रात सोडले जाते. वन विभागाच्या सहकार्याने ‘वाइल्ड लाइफ कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’ (डब्लूसीएडब्लूए) ही संस्था या केंद्राचे काम पाहते.

यंदा पावसाळ्यात जखमी अवस्थेत वाहून आलेल्या सुमारे ५० कासवांना या केंद्रात दाखल करण्यात आले होते. यामध्ये एका छोटय़ा सदस्याचादेखील समावेश होता. वयाने साधारण एक वर्षांचे ऑलिव्ह रिडले प्रजातीचे मादी पिल्लू ‘डब्लूसीएडब्लूए’च्या स्वयंसेवकांना १ ऑगस्टला डहाणूतील चुलने गावाच्या किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळले.

केंद्रातील हे सर्वात लहान कासव असल्याने त्याचे नामकरण ‘बच्चू’ असे करण्यात आले. त्याचा पुढील उजवा पाय काम करीत नसल्याचे पशुवैद्यकांना दिसले. हा पाय कवचावर ठेवून तीन पायांवरच हे पिल्लू पोहत होते.

पायाने काम न केल्यास तो बारीक होऊन निकामी होण्याच्या धोका होता. त्यामुळे केंद्राचे डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी फिजोओथिरपीद्वारे पिल्लावर उपचार करण्याचा निर्णय घेतला. व्यायाम पद्धतींचा अवलंब केला. पायाला शेक दिला गेला. दोन महिने व्यायाम आणि खाद्य मिळाल्याने पिल्लाचा पाय पुन्हा कार्यान्वित झाला आहे, असे डहाणूचे डब्लूसीएडब्लूएचे संस्थापक धवल कनसारा यांनी सांगितले.

केंद्रातील वैशिष्टय़पूर्ण प्रयोग

* कासव उपचार आणि संवर्धन केंद्रात दोन वर्षांपूवी एक पाय नसलेल्या कासवाला कृत्रिम पाय लावून पोहण्यासाठी उद्युक्त करण्यात आले होते. समुद्री कासवाला कृत्रिम पाय लावण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयोग होता.

* यंदा उपचार करून समुद्रात सोडलेल्या सात कासवांच्या शरीरामध्ये मायक्रोचिप बसविण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात ही कासवे पुन्हा किनाऱ्यावर आढळल्यास त्यांच्या शरीरातील मायक्रोचिप स्कॅन करून कासवाची माहिती मिळविता येणार आहे.

* समुद्री कासवांना मायक्रोचिप लावण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. बच्चूच्या शरीरातदेखील मायक्रोचिप बसविण्यात येणार आहे.

बच्चू अशक्त असल्याने त्याला हाताने खाद्य भरावावे लागत होते. फिजिओथेरपीद्वारे उपचार करण्यात आले. रोज विविध व्यायाम करून घेण्यात आले. याला बच्चूने १५ दिवसांतच चांगला प्रतिसाद दिला. नियमित व्यायाम आणि खाद्य भरविल्याने त्याचा पाय पुन्हा कार्यान्वित झाला आहे.

– डॉ. दिनेश विन्हेरकर, पशुचिकित्सक

First Published on October 12, 2018 3:02 am

Web Title: physiotherapy on sea turtle