मुंबई पालिकेने सुरू केलेली ‘खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा’ ही बहुचर्चित मोहीम ७ नोव्हेंबरला संपल्यामुळे खड्डेदुरुस्तीही आता थंडावली आहे. मोहीम संपल्यानंतरही नागरिकांनी mybmcpotholefixit या अ‍ॅपवर तक्रारी करणे सुरूच ठेवले आहे. या अ‍ॅपवर मोहीम संपल्यानंतरही २३३ तक्रारी आल्या असून त्यापैकी चोवीस तासांत केवळ पन्नास टक्के तक्रारीतील खड्डेच बुजवण्यात आले आहेत.

पालिकेने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा’ ही मोहीम राबवली. चोवीस तासांत खड्डा बुजवला नाही, तर पाचशे रुपये अधिकाऱ्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशातून दिले जातील, असेही प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत मुंबईकरांनी मोठय़ा प्रमाणावर अ‍ॅपवर तक्रारी केल्या. त्यापैकी ९० टक्के तक्रारीतील खड्डे पालिकेच्या संबंधित विभागांनी २४ तासांत बुजवले. उर्वरित तक्रारींतील खड्डेही नंतर बुजवण्यात आले. ७ नोव्हेंबपर्यंत पालिकेच्या यंत्रणेने १६३० खड्डे बुजवले.

गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या अ‍ॅपवर सात दिवसांत आलेल्या दीड हजारांहून अधिक तक्रारी वेगाने हाताळण्यात आल्या. मात्र ही मोहीम संपल्यानंतरही नागरिकांनी तक्रारी करणे सुरूच ठेवले आहे.

मोहीम संपल्यापासून ९ नोव्हेंबपर्यंत आणखी २३३ तक्रारी या अ‍ॅपवर आल्या आहेत. त्यापैकी केवळ १११ तक्रारीतील खड्डे बुजवण्यात आले. म्हणजेच केवळ ५० टक्के तक्रारींवर पालिकेच्या यंत्रणेने काम केले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना जरब बसून त्यांनी वेगाने काम करावे यासाठी पालिका आयुक्तांनी ही मोहीम सुरू केली होती. मोहीम संपली असली तरी खड्डे बुजवण्याची यंत्रणा सुरू राहावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

बक्षीस देण्यास टाळाटाळ..

मोहिमेच्या कालावधीत जे खड्डे २४ तासांत बुजवता आले नाही त्या खड्डय़ांच्या तक्रारदारांना बक्षीस देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. अधिकारी तक्रारदारांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात, एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पळवत असल्याचा अनुभव तक्रादारांना आला आहे. हा खड्डा नियमानुसार खड्डाच नाही, असेही उत्तर दिले जात असल्याचे तक्रारदार ‘पॉटहोल्स वॉरियर’ या संस्थेचे मुश्ताक अन्सारी यांनी सांगितले. तसेच आम्हाला तक्रारच उशिरा मिळाली, असेही कारण दिले जात आहे. त्यामुळे बक्षीस देण्यास पालिका टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला आहे.