दिवाळीची चाहूल लागताच घराघरांमध्ये खरेदीच्या याद्या तयार होऊ लागतात. यंदा दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांनी ऑनलाइन खरेदीलाही चांगलीच पसंती दिली असून सध्या कपडय़ांपेक्षा दागिने, गृहोपयोगी वस्तू, पुस्तके यांची मागणी जास्त असल्याचे चित्र आहे.
चार वेबसाइट तपासून, किमती पडताळून घरबसल्या खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने आता ऑनलाइन खरेदी वाढली आहे. दुकानांमध्ये सणासुदीला ‘सेल’ किंवा सवलतींचा मागमूसही नसतो. उलटपक्षी फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अ‍ॅमेझॉन यांसारख्या साइट्सने नवरात्र, दसरा, दिवाळी, करवाचौथ या सणांना नजरेसमोर ठेवत त्यांचे ‘सेल’ जाहीर केले आहेत. त्यामुळे बाजारपेठेपेक्षा कमी किमतीत वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांनी ऑनलाइन खरेदीला मागणी दिल्याचे चित्र दिसून आले. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांच्या संख्येमध्ये ३००% वाढ झालेली दिसून आली आहे. गेल्या दोन आठवडय़ांच्या सेलच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, बूट, स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या वस्तू, मुलांच्या आरोग्यविषयक आणि सौंदर्यप्रसाधने यांना सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र दिसून आले.
कपडय़ांच्या बाबतीतही नामांकित कंपन्यांनी नवीन ‘कलेक्शन्स’ ग्राहकांसाठी खुले केले आहेत. कपडय़ांच्या किमती साधारणपणे ५०० रुपयांपासून सुरू होऊन ३०,००० आणि त्यापुढेही आहेत. दागिन्यांच्या किमती ३०० रुपयांपासून सुरू होतात. या साइट्सवर पसंत न पडल्यास सामान परत पाठवण्याचा पर्यायही ग्राहकांकडे असतो, त्यामुळे बाजारात जाऊन धक्काबुक्कीत-घाईघाईत खरेदी उरकण्यापेक्षा ऑनलाइन खरेदीचा मार्ग लोक पसंत करू लागले आहेत. ‘अ‍ॅमेझॉन’वर गेल्या दोन आठवडय़ांत भारतातून बुटांच्या खरेदीत ३००% वाढ झालेली दिसून आली आहे.
ऑनलाइन मार्केटिंगचा भारतातील एकूणच व्यवसाय १८ कोटी डॉलपर्यंत वाढला आहे. दिल्ली, मुंबई, बंगलोर यांसारख्या मेट्रो शहरांमधील तरुण यात आघाडीवर आहेत. मोफत घरपोच सेवा, वस्तू परत करण्याची सोय यामुळे ऑनलाइन खरेदीला लोक पसंती देत आहेत. तसेच सामानाचे पैसे घरी चुकते करण्याच्या सोयीचा पर्याय ग्राहकांना जास्त पसंत पडतो, असे ‘जबाँग’चे सहसंस्थापक प्रवीण सिन्हा यांनी सांगितले.