पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात स्नान केले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर कुंभमेळ्यात स्नान करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कामगारांचे पाय धुवून त्यांचा सत्कार केला. याच गोष्टीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी सफाई कामगारांचे पाय धुतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र या कामगारांचे प्रश्न पायाचे नसून पोटाचे आहेत. डिजिटल इंडियामध्ये ही पायधुणी आली कुठून? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले आहे?

निवडणुकांची चाहूल लागली आहे. असेही म्हणता येईल की दरवाजांवर टकटक करून निवडणुकांचे वारे आत घुसले आहेत. एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा झाले हे चांगले झाले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाखांपैकी किमान दोन लाखांचा पहिला हप्ता जमा होईल अशी आशा पुन्हा जिवंत झाली आहे. जनतेचा पैसा जनतेच्याच खिशात जात आहे. हे सर्व निवडणुकीवर डोळा ठेवून चालले असल्याचा आरोप झाला आहे. आरोपांचे काय घेऊन बसलात? काही केले नाही तरी आरोप तर होतच असतात. निवडणूकपूर्व अर्थसंकल्प व घोषणा या राजकीय फायद्याचा विचार करूनच केल्या जातात व सत्तेवर असलेला प्रत्येक राजकीय पक्ष तेच करीत असतो. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केले, म्हणजे ‘डुबकी’ मारली. पंतप्रधानांनी गंगेत डुबकी मारली व नंतर सफाई कामगारांचे पाय धुऊन ‘करसेवा’ केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

समाजसुधारक ‘समतानंद’ अनंत हरी गद्रे यांनीही 1940च्या दशकात कोकणामध्ये ‘समतेसाठी सत्यनारायण’ ही संकल्पना हिरीरीने राबवली होती. झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्यास्पृश्य सत्यनारायण अशा दोन माध्यमांतून गद्रे यांनी अस्पृश्य निवारणाचे कार्य केले. मुख्य म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेसाठी यजमान म्हणून गद्रे अस्पृश्य समाजातील पती-पत्नीला बसवीत आणि या जोडप्याला लक्ष्मीनारायण मानून त्यांच्या पायाचे तीर्थ ते प्राशन करीत. अस्पृश्याच्या पायाचे तीर्थ उच्चवर्णीयाने प्राशन केले तरच ती खरी समता ठरेल अशी गद्रे यांची धारणा होती आणि त्यांनी ती तेवढ्याच प्रामाणिकपणे अमलात आणली. आता पंतप्रधानांनी गंगाकिनारी सफाई कामगारांचे पाय धुतले. याबद्दल अभिनंदन, पण सफाई कामगारांचे प्रश्न ‘पाया’चे नसून ‘पोटा’चे आहेत. ‘डिजिटल इंडिया’त ही ‘पायधुणी’ आली कोठून? ज्यांचे पाय धुतले ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत, देशातील जातीयवादी उन्माद गंगार्पण व्हावा हे पायधुणी’तून झाले तरी पंतप्रधानांची करसेवा सत्कारणी लागेल.