कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या खातेधारकांची रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज भेट घेतली. पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज आरबीआयने चर्चेसाठी बोलावल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असं आश्वासन दिलं आहे. यानंतर संतप्त खातेधारकांनी मोदींना लवकराच लवकर तोडगा काढावा अशी मागणी करत नक्की कोणते दिवस आणलेत अशी विचारणा केली आहे.

पीएमसी खातेदारकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्पन्न झाली. यावेळी आरबीआयने सध्या आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणं शक्य नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती एका खातेधारकाने दिली आहे. तसंच आरबीआयने २५ आणि २७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं सांगितलं आहे. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असंही आश्वासन दिलं आहे.

दरम्यान पीएमसी बँकेच्या खातेदारांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. पीएमसीच्या काही खातेदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेवर निर्बंध आणण्यात आले असून पैसे काढण्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. यामुळे अनेक खातेधारक चिंताग्रस्त असून धक्क्याने दोन खातेदारांचा मृत्यूदेखील झाला आहे. काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करत पैसे काढण्यावर मर्यादा आणणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने आधीच चिंताग्रस्त असणाऱ्या खातेदारांच्या चिंतेत भर टाकली असून दिलासा देण्यास नकार दिला.