‘पीएमसी’ घोटाळा प्रकरणाला सहा महिने उलटले तरी पैसे मिळण्यात अडचणी

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाला सहा महिने उलटले तरी खातेधारकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. लाखोंची ठेव विश्वासाने बँकेकडे सोपविणा ऱ्या सामान्य नागरिकांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे.

पीएमसी बँकेत ठेवलेले पैसे बुडाल्याच्या धक्क्याने ६० हून अधिक खातेदारांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही रिझव्र्ह बँकेने खातेदारांच्या मागणीची दखल घेतलेली नाही, असा आरोप खातेदारांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे वयोवृद्ध, निवृत्त, पतीच्या निधनानंतर एकाकी जगणा ऱ्या स्त्रिया, विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण यांची पैशांअभावी घुसमट होत आहे.

गोरेगाव येथील दीपक जोशी यांचा इलेक्ट्रिकचा व्यवसाय होता.  तेजीच्या काळात सर्व रक्कम त्यांनी पीएमसी बँकेत जमा केली. आता त्यांच्या व्यवसायाला टाळे लागले आहे.  मुलीचे लग्न, वृद्ध आई, घरातील आजारपण अशा अनेक अडचणी समोर आहेत. जोशी कुटुंबाची एकूण ८० लाखांची जमापुंजी बँकेत आहे. त्यामुळे सातत्याने लोकप्रतिनिधी आणि बँकेच्या अधिकारी वर्गाशी ते पत्रव्यवहार करत आहेत.

मुलुंडच्या ४३ वर्षीय बोनी लाल या महिला २००८ पासून कर्करोगग्रस्त आहे. वृद्ध आई-वडील आणि कुटुंबीयांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पीएमसी बँक प्रकरणानंतर मानसिक धक्क्याने त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. उपचारांदरम्यान मेंदूला गाठ असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.  वर्षभरात ८ ते १० लाख वैद्यकीय उपचारांवर खर्च होता. बँकेपुढे वारंवार हात पसरूनही दाद न मिळाल्याने त्या अधिकच खचून गेल्या. ‘बँकेत असलेले हक्काचे २५ लाख मिळाले तर माझे उपचार नीट होतील. सध्या कुटुंबाची स्थिती अत्यंत बिकट आहे,’ असे त्या हवालदिल होऊन सांगतात. तर ‘उतारकाळ बँकेतल्या पैशांवर काढायचा ठरवले आणि हा प्रकार झाला. निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम बँकेत ठेवली. पतीला हृदय आणि मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रासले आहे. महिन्याला किमान चाळीस ते पन्नास हजारांचा वैद्यकीय खर्च आहे. बँकेने आमचे पैसे परत दिले नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही,’ अशी व्यथा कोपरखैरणे येथील एका महिलेने नाव न देण्याच्या अटीवर सांगितली.

८४ टक्के  लोकांचे १०० टक्के  पैसे देऊ असे रिझव्र्ह बँक सांगते. परंतु ते ८४ टक्के  लोक ५ लाखांच्या आतील ठेवीदार आहेत. ज्यांच्या ठेवी ५ लाखांच्या वर आहेत त्यांचे काय. शिवाय ७ हजार कोटींची वसुली करूनही रिझव्र्ह बँक पीएमसीला पुनरुज्जीवित करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आहे. थोडक्यात बँक बुडवण्याचा खटाटोप सुरू आहे. या प्रकरणाला रिझव्र्ह बँकही तितकीच जबाबदार असल्याने आता हात झटकण्याची भूमिका योग्य नाही.

– विश्वास उटगी, सह निमंत्रक-कामगार संघटना संयुक्त कृती समिती.