विशेष न्यायालयाकडून सीबीआयची मागणी मान्य 

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा कर्ताकरविता आणि तो उघडकीस येण्यापूर्वीच फरारी असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या लंडनमधील बँक खात्यावर जप्ती आणण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी सीबीआयला परवानगी दिली. मोदी याच्या या बँक खात्यात १२ लाख ७० हजार ब्रिटिश पॉण्ड्स तसेच एक हजार २४४ अमेरिकी डॉलर एवढी रक्कम शिल्लक आहे.

मोदी याच्या लंडन येथील बँक खात्यात जमा असलेली रक्कम ही घोटाळ्यातीलच आहे. तसेच संबंधित बँकेने मोदी याच्यासोबतचे सगळे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेने ही रक्कम त्याच्या हवाली करण्याआधी या खात्यावर जप्ती आणण्यास परवानगी देण्याची मागणी सीबीआयने एका अर्जाद्वारे विशेष न्यायालयाकडे केली होती. विशेष न्यायालयाने त्याची ही मागणी सोमवारी मान्य केली.

हॅरो येथील बँकेत मोदी याचे खाते असल्याची बाब तपासादरम्यान उघड झाली. तसेच घोटाळा उघडकीस आल्यानंतर संबंधित बँकेने मोदी याच्यासोबतचे संबंध संपवण्याचा आणि खात्यातील शिल्लक रक्कम त्याला परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही समजले आहे, असेही सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सरदार तांबोळी यांनी सीबीआयची ही मागणी मान्य करत मोदी याच्या लंडनमधील खात्यावर जप्ती आणण्यास परवानगी दिली.