पीएच.डी.चे तयार प्रबंध विकणाऱ्या ‘शोधइंडियाडॉटकॉम’ बाबत ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या संस्थेची दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पीएच.डी.चे प्रबंध, शोधनिबंध विकणाऱ्या ‘शोधइंडियाडॉटकॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालणारे गैरप्रकार ‘लोकसत्ता’ने चव्हाटय़ावर आणले. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती.

वाङ्मयचोरीच्या प्रमाणानुसार प्रबंध लिखाणाच्या जाहिराती, देशभरातील अडीचशेहून अधिक प्राध्यापकांचा सहभाग, परराज्यातील विद्यापीठांतून मराठी साहित्यात पीएच. डी. मिळवून देणे, आयोगाने जाहीर केलेल्या संशोधनपत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करण्याची या संस्थांची आश्वासने असे अनेक गैरप्रकार यातून उजेडात आले आहेत.

देशपातळीवर ही बनवाबनवी करणाऱ्या ‘शोधइंडियाडॉटकॉम’ बाबतच्या वृत्ताची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या संकेतस्थळाबाबत आयोगाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

‘आयोगाने तयार केलेल्या संशोधनपत्रिकांच्या यादीतील (केअर लिस्ट) पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करण्याचा दावा शोधइंडियाडॉटकॉमने केला आहे. त्याबाबतचे ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त समाजमाध्यमांवरही ‘व्हायरल’ झाले आहे. असे दावे करणाऱ्या किंवा गैरप्रकार करणाऱ्या संस्थांबाबत अधिक तपास होणे गरजेचे आहे’, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.