गेल्या वर्षी ३९ पथकांविरुद्ध गुन्हा दाखल; ८ आयोजकांविरोधात तक्रार

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांना तिलांजली देणाऱ्या आणि थरामध्ये उभे राहणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांना अटकाव न करणाऱ्या आयोजकांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या आयोजकांविरुद्ध यंदाही पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय लोक जनजागृती सामाजिक संस्थेने घेतला आहे. त्यामुळे आयोजकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी आठ आयोजकांविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली असून ३८ पथकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या थरात उभे राहण्यास मनाई केली आहे. तसेच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने आयोजकांना दिले आहेत. मात्र गेल्या वर्षी काही आयोजकांकडून या आदेशांना हरताळ फासण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा घालावी, लहान मुलांचा थरात वापर करू नये, सुरक्षेचे उपाय करावे आदींसाठी आग्रह धरणाऱ्या लोक जनजागृती सामाजिक संस्थेने गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाय न करणाऱ्या, तसेच दहीहंडी फोडण्यासाठी लहान मुलांना थरावर चढविण्यात आल्याबद्दल मुंबई-ठाण्यातील दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आठ आयोजकांविरुद्ध पोलिसात तक्रार केली. दादरमध्ये दहीहंडी उत्सवात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याप्रकरणी शिवसेना शाखा क्रमांक १९२, मनसे, आयडियल येथील दहीहंडी आयोजकांविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुर्ला बैलबाजार, घाटकोपर, चेंबूर नाका, तसेच ठाण्यातील दोन बडय़ा आयोजकांविरुद्धही पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांनी लोक जनजागृती सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचे जबाबही नोंदवून घेतले आहेत. तसेच मुंबईतील सुमारे ३९ गोविंदा पथकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येत्या २४ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असून मुंबईतील समस्या गोविंदा पथकांमधील गोविंदा थर रचण्याचा सराव करीत आहेत. न्यायालयाने दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी बंधनकारक केलेल्या सुरक्षेच्या उपायांना गेल्या वर्षी काही आयोजकांनी हरताळ फासल्याची बाब निदर्शनाला आली आहे. ही बाब लक्षात घेत यंदाही सुरक्षेचे उपाय न करणाऱ्या आयोजकांविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय लोक जनजागृती सामाजिक संस्थेने घेतला आहे. त्यासाठी संस्थेची पथके २४ ऑगस्ट रोजी विविध भागात कार्यरत राहणार आहेत.

या उपाययोजना करणे गरजेचे

* सुरक्षेच्या दृष्टीने दहीहंडी खाली गाद्या किंवा तत्सम मॅट घालावे.

* गोविंदांसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, चेस्ट पॅड्सची व्यवस्था करावी

* १४ वर्षांखालील मुलांना थरात सहभागी होऊ देऊ नये

* दहीहंडी स्थळी समूह विमा काढावा

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १४ वर्षांखालील मुलांना थरात उभे राहण्यास मज्जाव आहे. मात्र आयोजक मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा आयोजकांविरुद्ध यंदाही पोलिसात तक्रार करण्यात येईल. गोविंदांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

-अ‍ॅड. स्वाती पाटील, लोक जनजागृती सामाजिक संस्था.