वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे व मुंबई पोलिसांचे कुटुंबियांनी रविवारी मोतोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज्यातील सर्व पोलीस असुरक्षित असून पोलिसांवर  हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, तसेच सरकारने याप्रकरणी ठोस भूमिका मांडावी, अशी विनंती यावेळी कुटुंबियांकडून करण्यात आली.  उद्धव ठाकरे यांनी सर्व कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच त्यांना योग्य न्याय मिळवून देऊ, असा विश्वासही दिला. पोलिसांच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी  उद्धव ठाकरे ७ सप्टेंबर रोजी पोलीस कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. हेल्मेटसारख्या प्रकरणावरुन पोलिसांवर हल्ले होत राहिले तर पोलिसांना वर्दीऐवजी चिलखते पुरवावे लागतील, असे सांगत मारलेल्यांना फक्त ‘शहीद’ घोषित करून जबाबदारी झटकता येणार नाही, असे खडेबोल शिवसेनेने यापूर्वी मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला सुनावले होते. राज्यात पोलिसांवर हल्ले करुन त्यांना मारले जात असेल, तर राज्याला हा प्रकार शोभनिय नसल्याचे सांगत गृहखात्याला पोलिसांच्या वर्दीला बळकटी देण्याची गरज असल्याचे मतही शिवसेनेने मांडले होते. राज्यात खाकी वर्दीवर दिसणारी भयावह परिस्थिती असल्यास जनतेच्या आयुष्याचे व सुरक्षेचे तीनतेरा वाजायला वेळ लागणार नाही, असा टोलाही सेनने यापूर्वी भाजपला लगावला होता. विलास शिंदे यांच्या निधनानंतर देखील  मुंबईतील पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार समोर आले आहेत. शनिवारी ठाण्यामध्ये पोलिस हवालदाराला एका वाहन चालकाने फरपटत नेल्याचा प्रकार समोर आला होता. तर यापूर्वी कुर्लाच्या वाहतूक हवालदाराला एका वाहन चालकाने धडक दिल्याचा प्रकार घडला होता.