‘सोसायटी कॉप’ उपक्रमाकडे पोलिसांचे दुर्लक्ष; घरकामगारांची नोंद ठेवण्याबाबत उदासीनता

मुंबई : 

खार येथील वयोवृद्ध मखिजिया दाम्पत्याच्या हत्याकांडानंतर मुंबईतील एकाकी वा दिवसभर घरात एकटेच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वृद्धांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा पोलीस दलाकडून करण्यात येत असला तरी, मुंबई पोलीस दलातील एका परिमंडळाने काही वर्षांपूर्वी प्रभावीपणे राबवलेल्या ‘सोसायटी कॉप’ या योजनेचा पोलिसांना विसर पडला आहे. दुसरीकडे, घरकाम करणाऱ्यांची स्थानिक पोलीस ठाण्यांत नोंद करण्याबाबत नागरिक गंभीर नाहीत आणि पोलीसही याबाबत कठोर पावले उचलताना दिसत नाहीत.

वयोपरत्वे जडलेल्या शारीरिक व्याधी, कमकूवत शरीर यांमुळे वयोवृद्ध नागरिक हे गुन्हेगारांसाठी सोपे लक्ष्य ठरत आहेत. पश्चिम उपनगरांमधील वांद्रे, खार, जुहू, सांताक्रूज, विलेपार्ले आणि दक्षिण मुंबईतील कफपरेड, कुलाबा, मलबार हिल परिसरात एकाकी वास्तव्य करणाऱ्या वृद्धांची संख्या जास्त आहे. काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या परिमंडळ नऊमध्ये एकाकी वृद्धांचे हत्यासत्र घडले. तेव्हा तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी ‘सोसायटी कॉप’ नावाचा उपक्रम राबवला. या उपक्रमानंतर पुढील दोन वर्षे या भागातील वृद्धांविरोधातील गुन्ह्यांसह चोरी, लुटमार, दरोडा यासह अन्य गुन्हेगारीही घटली होती. पुढे अतिरिक्त आयुक्त झाल्यावर त्यांनी हा प्रयोग दक्षिण मुंबईत सुरू केला. तेथेही या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम जाणवला. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हा उपक्रम बंद पडला.

‘सोसायटी कॉप’ उपक्रमांतर्गत विभागातील  पाच इमारतींची जबाबदारी एका पोलीस शिपायावर सोपवण्यात आली होती. हा शिपाई दर दुसऱ्या व चौथ्या शनिवारी त्या इमारतींतील प्रत्येक घरात जाऊन तेथील घरकामगार, वृत्तपत्रविक्रेते वा अन्य व्यक्तींची माहिती नोंदवून घेत असे. नोकराचे नाव, त्याचा मोबाइल नंबर, मूळ गाव, तेथील नोकराला ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे मोबाइल नंबर, मुंबईतला पत्ता, मुंबईत या नोकराला ओळखणाऱ्या दोन व्यक्तींचे नंबर, त्याचे छायाचित्र अशा स्वरूपात ही माहिती गोळा केली गेली. त्यानंतर एकटेच राहणारे, पती वा पत्नीसोबत राहणारे आणि कुटुंबासोबत राहणारे अशा तीन वर्गात ज्येष्ठ नागरिकांची विभागणी करण्यात आली. त्यानंतर एकाकी राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आठवडय़ातून तीन ते चार वेळा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पोलीस कर्मचारी त्यांची विचारपूस करत असत.

पोलिसांच्या या उपक्रमामुळे परिमंडळ नऊमधील गुन्हेगारी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या कारवाया कमी झाल्या. दीड वर्षांमध्ये वृद्धांवरील गुन्हेगारीला पूर्णपणे चाप लागला होता तर अन्य गुन्हय़ांचे प्रमाणही घटले होते, असा दावा दिघावकर यांनी केला आहे.

माहिती घेताच पाचशे जण परागंदा

‘सोसायटी कॉप’ उपक्रमात परिमंडळ नऊमधील वांद्रे, खार, जुहूसह अन्य पोलीस ठाण्यांमधील मिळून तब्बल ६८ हजार जणांच्या तपशिलांची नोंद करण्यात आली. इमारतींमध्ये या उपक्रमाची माहिती देणारी भित्तिपत्रके चिकटवण्यात आली. त्यामुळे कटकारस्थान वा गुन्हेगारी कारवाई करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांवर मोठा वचक बसला. या काळात या भागांतील पाचशे नोकर परागंदा झाल्याचा दावा दिघावकर यांनी केला आहे.

‘हेल्पलाइन सक्रिय’

वृद्धांच्या सुरक्षेसाठी १०९० हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यावर कौटुंबिक जाचापासून विविध प्रकारच्या तक्रारी येतात. त्या तातडीने संबंधित पोलीस ठाण्यांना कळवून वृद्धांच्या तक्रारींचे निरसन केले जाते, अशी प्रतिक्रिया मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते दीपक देवराज यांनी दिली.

‘सोसायटी कॉप’ उपक्रमामुळे इमारतींमधील रहिवाशांचे पोलिसांशी ऋणानुबंध निर्माण झाले. अनेकदा इमारतीमधील कार्यक्रमांना या शिपायांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जायचे व त्यांचा सन्मान केला जायचा.

– प्रताप दिघावकर, तत्कालिन पोलीस उपायुक्त