अभिनेत्री जिया खान हिचा खून झाल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नसताना तिच्या आईने पुन्हा एकदा या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निश्चित केले आहे. जियाच्या मृत्यूनंतर पोलीसांकडे दिलेल्या वस्तूंवरून तिचा खून झाल्याचे दिसते, असा दावा जियाची आई रबिया खान यांनी केला. मुंबई पोलीसांनी गेल्याच आठवड्यात जियाच्या आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये अभिनेता सूरज पांचोली याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
जिया खान हिने गेल्या वर्षी ३ जून रोजी जुहूमध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र, आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिचा खून करण्यात आल्याचा आरोप रबिया खान यांनी केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही पोलीसांनी त्यांच्याकडे दिलेल्या वस्तूंचा तपास योग्य पद्धतीने केला नाही, असा आरोप जिया खान यांनी केला.
मुंबई पोलीसांनी गेल्याच आठवड्यात ४४७ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये जिया खान हिने आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. जियाचा खून झाल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. रबिया खान यांनी दिलेल्या वस्तूंचाही आम्ही तपास केला. मात्र, त्यातूनही जियाचा खून झाल्याचा पुरावा मिळाला नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2014 5:50 am