न्यायालयाने दिलेल्या मंडपबंदीच्या आदेशावर पालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे लक्ष केंद्रित झाल्यामुळे यंदा गणेशोत्सवातील सुरक्षाव्यवस्थेकडे तिन्ही यंत्रणांचे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. सुरक्षाव्यवस्थेबाबत दरवर्षी पोलिसांकडून स्लाईड-शोच्या माध्यमातून प्रात्यक्षिकासह केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा यंदा पोलिसांना विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर सुरक्षेबाबत चारपैकी तीन विभागात मंडळांबरोबर पोलिसांनी बैठकाच घेतलेल्या नाहीत. असे असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मात्र मंडप परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आल्यानंतर पालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या जातात. त्याचबरोबर पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चार विभागांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्या त्या विभागांतील पोलीस अधिकारी घेत असतात. मंडप आणि आसपासच्या परिसरात सरक्षाव्यवस्था कशी असावी याचे स्लाईड-शोच्या माध्यमातून पोलिसांकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर एखादी बेवारस वस्तू मंडपस्थळी आढळल्यास कोणती काळजी घ्यावी याबाबतही पदाधिकाऱ्यांना माहिती दिली जाते. दहशतवाद्यांचे मोठे आव्हान असल्यामुळे त्याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. मंडळांच्या स्वयंसेवक सुरक्षाव्यवस्था कशी ठेवणार याचा आढावाही बैठकीत घेतला जाते. यंदा सुरक्षे संदर्भात केवळ उत्तर विभागाची बैठक झाली. गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपला तरी उर्वरित तीन विभागांतील पोलीस अधिकाऱ्यांनी ही बैठक घेतलेलीच नाही. अलीकडेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

दरवर्षी पोलिसांबरोबर होणाऱ्या बैठकांमध्ये मंडळाच्या नव्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन मिळते आणि त्या दृष्टीने ते गणेशोत्सव काळात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात मदत करतात. यंदा तीन विभागांमध्ये बैठकच झालेली नाही. त्यामुळे अनेक मंडळांतील नव्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळू शकलेले नाही. तरही बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांना माहिती देण्यात येत आहे. त्यानुसार मंडपस्थळ आणि आसपासच्या परिसरात सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.
अॅड. नरेश दहिबावकर
अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती