वाहन तपासणी करणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाला मोटारसायकलस्वार दांपत्याने भर रस्त्यात मारहाण केली. ही घटना भायखळा येथे घडली. हेल्मेट नसल्याने दंड आकारताच संतप्त झालेल्या या मोटारसायकलस्वाराने पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेष पकडून त्यांना मारहाण केली.
मंगळवारी दुपारी भायखळ्याच्या वाहतूक पोलीस जिजामाता उद्यानासमोर वाहनतपासणी करीत होते. या पथकात पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस होते. त्यावेळी हेल्मेटशिवाय मोटारसायकलीवरून जाणाऱ्या एका दांपत्याला पोलीस निरीक्षक जनार्दन पाटील यांनी थांबवले. हेल्मेट नसल्याने त्यांना शंभर रुपये दंड भरण्यास त्यांनी सांगितले. परंतु मोटारसायकलस्वार हिमायताली चौधरी (४३) याने पाटील यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, समाजसेवक असून आपल्या खूप ओळखी असल्याचे सांगत त्याने दंड देणार नाही, अशी मग्रुरीची भाषा सुरू केली. त्याची पत्नी नगमा (३५) हिनेही मध्ये पडून पाटील यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.
चौधरीने भररस्त्यात आपली मोटारसायकल आडवी पाडली आणि तो पाटील यांच्याशी तावातावाने भांडू लागला. थोडय़ाच वेळात संतापलेल्या चौधरीने भर रस्त्यातच पाटील यांचा गणवेष पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात पाटील यांचा गणवेशही फाटला. इतर पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप करत चौधरी दांपत्याला अटक केली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण तसेच धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे