05 March 2021

News Flash

‘ठाकरे प्रेमा’च्या झऱ्यांना राजकीय रंग!

उभयतांमधील मैत्रीचा धागा उलगडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला, तर बाळासाहेब व मीनाताई आपल्याला आई-वडिलांप्रमाणे असल्याची

| December 3, 2012 02:45 am

उभयतांमधील मैत्रीचा धागा उलगडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला, तर बाळासाहेब व मीनाताई आपल्याला आई-वडिलांप्रमाणे असल्याची भावना बोलून दाखवत छगन भुजबळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे नेते बाळासाहेबांसोबतच्या आपलेपणाच्या नात्याचे पदर उलगडू लागले असून शिवसेनेच्या मतपेढीला खिंडार पाडण्यासाठी व मुंबई ठाण्यातील मराठी मतांवर डोळा ठेवूनच हे ‘प्रेमाचे राजकीय झरे’ वाहू लागल्याची टीका मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केली आहे.
बाळासाहेबांनी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर ठाकरी भाषेत प्रहार केले, पण त्यांचे वैयक्तिक संबंध सर्वाशीच चांगले होते. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या मुंबई व ठाण्यातील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लावलेले भव्य
कटाऊट तसेच प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातींबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार व त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक करण्याची स्पर्धाच सुरू झाली. मुंबईतील मराठी मतांवर डोळा ठेवूनच बाळासाहेबांच्या जवळीकीचे भांडवल करण्याची स्पर्धा सुरू असल्याचा आरोप मनसेच्या या नेत्याने केला.
राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नेत्यांनी त्या दिवशी वृत्तवाहिन्यांचा जणू काही ताबा घेतल्यासारखे दिसत होते. शरद पवार यांनी तर बाळासाहेब व त्यांच्या मैत्रीचे अनेक दाखले दिले. बाळासाहेब शब्दाला जागणारे कसे आहेत. तसेच आपल्या मुलीच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी सेनेचा उमेदवार देणार नाही, असे सांगून कसा राजकीय दिलदारपणा दाखवला याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
छगन भुजबळ यांनी तर बाळासाहेब हे आपल्याला वडिलांसारखे असल्याचे सांगून शरद पवारांवरही कडी केली.
मात्र बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा याच शरद पवार यांनी हे मित्रप्रेम का दाखवले नाही, वडिलांसमान असलेल्या बाळासाहेबांना अटक करण्याचा ‘भीम पराक्रम’ छगन भुजबळ यांनी केला, तेव्हा पवार गप्प का राहिले, असा सवालही या नेत्याने केला. मुंबईत राष्ट्रवादीला राजकीय स्थान नाही. मराठी व अमराठी दोन्हींकडून फारसे मतदान होत
नसल्यामुळे बाळासाहेबांच्या निमित्ताने मराठीजनांची सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे या नेत्याने सांगितले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 2:45 am

Web Title: political love in thackery
टॅग : Political
Next Stories
1 गुणीदास संगीत संमेलनात यंदा दिग्गजांचा कलाविष्कार
2 टोल चे गौडबंगाल
3 वाकोल्यात एमबीएच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Just Now!
X