मराठा क्रांती मोर्चाचा काँग्रेसला इशारा

मुंबई : सरकारी नोकऱ्यांत पदोन्नतीमधील आरक्षणावरून शिवसेना व राष्ट्रवादीने संयमी पवित्रा घेतला असताना काँग्रेसमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांनी आग्रही भूमिका घेतल्याने मराठा आरक्षणानंतर आता या विषयावरून राजकारण तापू लागले आहे. पदोन्नतीत आरक्षण ठेवण्यावरून काँग्रेसने जातीय तेढ निर्माण करू नये, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

एकीकडे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसमधील नेते मराठा आरक्षणाचा प्रशद्ब्रा सोडवण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेसमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारखे नेते आक्रमक झाले आहेत. या विषयावर काँग्रेस पक्ष ठाम असून याप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मेचा शासन आदेश रद्द करायला राज्य सरकारला भाग पाडू, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडली.

काँग्रेसच्या या भूमिके नंतर मराठा क्रांती मोर्चाही आक्रमक झाला. पदोन्नतीतील आरक्षणामुळे के वळ मराठाच नाही तर सर्वसाधारण व  अन्य मागास जातींवरही वर्षानुवर्षे अन्यायच झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानेच सरकारने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र जातीयवादी भूमिका घेत काँग्रसने या निर्णयाला के लेला विरोध हा आरक्षणाचा लाभ नसलेल्या सर्वच समाज घटकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे उद्योग काँग्रेसने थांबवावेत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी दिला.

या निर्णयाला विरोध करण्यापूर्वी फक्त मराठा समाजच नाही तर पदोन्नतीतील आरक्षणाचा लाभ नसलेल्या तर इतर मागास जातींवर सुद्धा वर्षानुवर्षे अन्याय झाला आहे व काँग्रेस पक्ष आजही अशा अन्यायाचे समर्थन करत आहे हेही लक्षात घ्यावे, असे मराठा क्रांती मोर्चाने महामुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. या निर्णयावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत हे वारंवार जातीयवादी भूमिका घेत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून हटवावे अशी मागणी क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांकडे के ली आहे.

महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी -फडणवीस

पदोन्नतीमधील आरक्षणावरून काय भूमिका घ्यायची यावरून आघाडी सरकारमध्ये दोन मतप्रवाह दिसत असल्याने या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी के ली आहे.