मुंबई : अश्लील चित्रफितींची निर्मिती व प्रसारणप्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राला न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलैला अटक केली होती.

हॉटशॉट या अ‍ॅपद्वारे कुंद्राने अश्लील चित्रफितींचे चित्रण केले. त्याद्वारे ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या चार महिन्यांच्या कालावधीत अ‍ॅपल कंपनीकडून कुंद्राला १ कोटी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर गुगल प्लेस्टोरवरील अ‍ॅपचे त्याचे सर्वाधिक वापरकर्ते होते. त्यातून गुगलकडून मोठा महसूल त्याला मिळाल्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी गुगलकडून माहिती मागविली आहे. तसेच या हॉटशॉट अ‍ॅपची पोर्नोग्राफिक संकेतस्थळावर जाहिरात करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

दरम्यान राज कुंद्राच्या कार्यालय आणि घरून प्राप्त केलेल्या संगणक, हार्ड डिस्क, सव्‍‌र्हर, मोबाइल फोन यामधून पोलिसांनी मोठी माहिती हस्तगत केली आहे. त्यातील काही माहिती आरोपींनी डिलीट केली आहे. या माहितीचे विश्लेषण करण्याकरिता पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक केली आहे. याप्रकरणात आणखी काही महिलांनी पुढे येऊन तक्रार दिली आहे.

दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी झालेली अटक बेकायदा असल्याचा दावा करत व्यावयासिक कुंद्राने केलेल्या याचिकेवर पोलिसांचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. कुंद्रा यांच्या याचिकेवर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे आदेश देत न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवली. पोलिसांनी अटकेपूर्वी कुंद्रा यांना नोटीस देणे अनिवार्य होते. मात्र पोलिसांनी त्यांना थेट अटक केल्याचा आरोप कुंद्रा यांच्यातर्फे करण्यात आला. कुंद्रा यांना अटकेपूर्वी नोटीस देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.