भिवंडी-खाडीपार भागात मंगळवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. मात्र सकाळपर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात यश आले असून एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या चाळीवर ही इमारत कोसळल्याने रात्रीपासून अग्निशमन दल आणि ‘एनडीआरएफ’ टीम युद्धपातळीवर मदतकार्य करत होती. अखेर आज सकाळपर्यंत ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

या ढिगाऱ्याखाली एकूण ९ लोक अडकले होते. सर्व जणांना बाहेर ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांमध्ये ५ स्त्रिया, ३ पुरुष आणि एका २ वर्षीय बालकाचा समावेश होता. मात्र या घटनेत २५ वर्षीय खेरेनिसा इस्माईल शेख या तरुणीचा मृत्यू झाला. पण झरार अहमद शेख (४५), मुन्नाभाई चायवाला (४५), आयुब सिराज सय्यद (६३), शेख मरियम झरार (९), शफीयबी युसूफ सरदार (६०), मेहेरुनिसा शेख (४०), खानूनबी अयुब सय्यद (४५) आणि उमर इस्माईल सय्यद (बालक) यांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले.

ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आल्यामुळे इमारत खाली करण्यात आली होती. मात्र, या इमारतीच्या शेजारची घरे खाली करण्यात आली नव्हती. त्यातच इमारतीचा काही भाग थेट शेजारच्या घरांवर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ८ ते ९ जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. त्यातील साऱ्यांना आता बाहेर काढण्यात आले आहे.