मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अनेक विभाग सध्या विद्याथ्र्यांच्या शोधात आहेत. सिंधी, गुजरातीसह काही विभागांना यंदा विद्यार्थीच मिळाले नसल्याचे अधिसभा सदस्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत निदर्शनास आणले. विद्यार्थी नसलेले विभाग बंद करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली.

विद्यापीठाच्या कला विभागांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला गेली काही वर्षे ओहोटी लागली आहे. अरेबिक, गुजराती, सिंधी, आफ्रिकन स्टडीज, युरेशिअन स्टडीज, पर्शियन, जर्मन या विभागांमध्ये गेली दोन-तीन वर्षे एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतले आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता साधारण २० ते ३० आहे. त्यापैकी गुजराती, सिंधी, रशियन, आफ्रिकन स्टडीज या अभ्यासक्रमाला यंदा एकही प्रवेश झाला नाही. या शिवाय इतरही अनेक कला अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेच्या निम्मेही प्रवेश झालेले नाहीत. याबाबत सदस्य सुधाकर तांबोळी यांनी अधिसभेत प्रश्न उपस्थित केले.

‘अनेक विभागांमध्ये विद्यार्थी मिळत नाहीत. गेली अनेक वर्षे विभागातील पायाभूत सुविधा, प्राध्यापक यांचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे. विभाग प्रमुख किंवा तेथील प्राध्यापक प्रवेश वाढावेत म्हणून काहीच प्रयत्न करत नाहीत. विद्यापीठही याबाबत गंभीर नाही,’ असे आक्षेप सदस्यांनी घेतले. ज्या विभागांमध्ये विद्याथ्र्यांनी अजिबात प्रवेश घेतलेले नाहीत किंवा एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे, असे विभाग बंद करावेत,’ असे मतही सदस्यांनी व्यक्त केले. विभाग बंद करणे योग्य होणार नाही. मात्र, विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न उपाय योजण्यात येत आहेत, असे  विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

विद्यार्थी संख्येत घट

गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार मराठी विभागात १५० पैकी २५ जागांवर, भाषाशास्त्र विभागात ७५ पैकी १४ जागांवर, फ्रेंच विभागातील ५० पैकी १४ जागांवर, तत्वज्ञान विभागात १२० पैकी ५१ जागांवर, पाली विभागात १०० पैकी ४९ जागांवर प्रवेश झाले आहेत.