शैलजा तिवले

टाळेबंदीमुळे सध्या काही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता कर्करुग्ण, मेंदू, मुत्राशय, हाडांचे विकार अशा हजारो शस्त्रक्रिया पुढे ढकलेल्या आहेत. टाळेबंदी मागे घेतल्यावर मात्र या शस्त्रक्रियांचा ताण एकाच वेळेस आरोग्य व्यवस्थेवर येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने नियोजन होण्याची गरज आहे.

विरार येथील ४५ वर्षीय सुमन(नाव बदलले आहे) यांना मासिक पाळीचा त्रास असल्याचे गर्भपिशवी काढण्यास सांगितली होती. करोनामुळे मार्चमध्ये नियोजित केलेली शस्त्रक्रिया रद्द केली आहे. रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात दुखणे याचा खूप त्रास होत आहे. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर मार्चमधली तारीख मिळाली होती. परंतु आता कधी शस्त्रक्रिया होईल हेच माहित नाही. तोपर्यत हे दुखणे घेऊन जगणे असह्य़ होत असल्याचे सुमन यांनी सांगितले.

सुमनसारखे अनेक रुग्ण आपली दुखणी घेऊन टाळेबंदी मागे घेतल्यावर प्रलंबित शस्त्रक्रियांमध्ये आपला नंबर कधी लागेल याची वाट पाहत आहेत.

टाटा मेमोरियल रुग्णालयात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असे जवळपास १० हजार लोक दरदिवशी येत असतात. हा आकडा कमी करत ७०० वर आणला आहे. त्यामुळे सामाजिक अंतर पाळत आणि योग्य ती काळजी घेऊन सेवा देणे शक्य असल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालायचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी व्यक्त केले.

कर्करुग्णांच्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया सध्या केल्या जात असून ६० वर्षांवरील आणि अतिजोखमीच्या व्यक्तींच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलेल्या आहेत. सध्या ५० टक्के शस्त्रक्रिया केल्या जात असून प्रलंबित राहिलेल्या शस्त्रक्रियांचा पुढील काळात एकदम ताण येणार हे नाकारता येत नाही, असेही पुढे डॉ. बडवे स्पष्ट करतात.

सध्याच्या परिस्थितीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान संसर्ग होण्याची भीती असल्याने काही रुग्णालयांनी करोना चाचणी करून त्यानंतर जीवनावश्यक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयात प्रसूती प्रामुख्याने केल्या जात असून सुरक्षितता म्हणून याआधी त्यांची करोना चाचणी केली जात  आहे,’’ असे मदरहूड रुग्णालयाच्या संचालक लिशा मोहंती यांनी नमूद केले.

मिरजच्या जिल्हा रुग्णालयात सध्या करोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊन नियमित शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या प्रमाणे करोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी शस्त्रक्रियेचे नियोजन केल्यास व्यवस्थेवरील भार कमी होऊ शकेल, असे अतिरिक्त प्रभारी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात दरदिवशी छोटय़ा मोठय़ा अशा जवळपास २५० शस्त्रक्रिया केल्या जातात. सध्या यातील ९० टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलेल्या आहेत, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी नमूद केले.