५२२ रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा निर्धार

मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यांचा मनस्ताप सहन करावा लागू नये म्हणून पालिकेने २०१८-१९ या वर्षांमध्ये ७३ मोठय़ा चौकांसह (जंक्शन) तब्बल एक हजार १०६ रस्त्यांची कामे हाती घेण्याचा संकल्प सोडला आहे. त्यापैकी ५२२ रस्त्यांची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून ही कामे ३१ मे २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. उर्वरित ५८४ रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात हाती घेण्यात आलेल्या ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावाही पालिकेकडून करण्यात आला आहे.

दरवर्षी पावसाच्या तडाख्याने रस्ते खड्डेमय होतात आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसतो. त्यामुळे पालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने प्रकल्प रस्ते, प्राधान्यक्रम २ व ३ अशी रस्त्यांची वर्गवारी केली असून या वर्गवारीनुसार रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ‘स्टॅक’ समितीच्या सल्ल्यानुसार प्रशासनाने रस्ते कामांसाठी धोरण आखले असून या धोरणानुसार रस्त्याचा पाया, खडीकरण, पृष्ठीकरण इत्यादी कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.

या वर्षी प्रकल्प रस्त्यांची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. पुनर्बाधणी करण्यात येणाऱ्या प्रकल्प रस्त्यांच्या ६४८ कामांमध्ये ३६ मोठय़ा चौकांचाही समावेश करण्यात आला असून त्यापैकी २९ जंक्शनचा समावेश असलेली ३११ कामे मेअखेरीस पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच पावसाळ्यानंतर प्रकल्प रस्त्यांची ३३७ कामे हाती घेण्यात येणार असून त्यामध्ये सात मोठय़ा चौकांचा समावेश आहे, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.

प्रशासनाने यंदा ३७ मोठय़ा चौकांसह प्राधान्यक्रम २ व ३ अंतर्गत रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची ४५८ कामे हाती घेण्यात येणार आहेत. पैकी १७ मोठय़ा चौकांचा समावेश असलेली २११ कामे मेअखेपर्यंत पूर्ण होतील, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. तर पावसाळ्यानंतर रस्त्यांची २४७ कामे हाती घेण्यात येणार असून त्यामध्ये २० मोठय़ा चौकांचा समावेश आहे, असे विनोद चिठोरे यांनी सांगितले.

गेल्या पावसाळ्यानंतर पालिकेने हाती घेतलेल्या मुंबईमधील तब्बल ८७९ रस्त्यांची कामे पूर्ण केली असून यामध्ये ‘प्राधान्यक्रम १’मधील १०७, ‘प्राधान्यक्रम २’मधील ३४७, तर ‘प्राधान्यक्रम ३’मधील ६१ आणि प्रकल्प रस्त्यांच्या ३६४ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.