नवरात्रीतील ‘गरबीं’ना यंदा अल्प प्रतिसाद; कुंभारांचे दिवाळीकडे डोळे

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : दहीहंडीसारखा महत्त्वाचा उत्सव हातून गेल्यानंतर आता नवरात्रीला गरबीला असलेल्या मागणीमुळे व्यवसायाला तेजी येईल या आशेवर कुंभार व्यावसायिक आहेत. त्यामुळे नवरात्रीत पुजल्या जाणाऱ्या गरबींची निर्मिती कुंभारांनी केली आहे, परंतु ग्राहकांकडून जेमतेम प्रतिसाद असल्याने कुंभारांचे डोळे दिवाळीकडे लागले आहेत.

नवरात्रीत गुजराती समाजाकडून गरबी पुजल्या जातात, तर बंगाली लोकांकडूनही घटपूजेसाठी मातीची भांडी वापरली जातात. त्यामुळे या काळात मातीच्या भांडय़ाना मोठी मागणी असते. परंतु यंदा दरवर्षीसारखी विक्री झाली नसल्याचे व्यावसायिक सांगतात. मुंबईच नाही राज्यातील अनेक किरकोळ विक्रेते धारावीतील कुंभारवाडय़ात नवरात्रीच्या काळात येतात. परंतु यंदा बराच माल फोनवर बोलाचाली करून विकला जात आहे. त्यात दरवर्षीपेक्षा मागणी घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. ‘संपूर्ण कुंभारवाडय़ातून २५ ते ३० हजार गरबी मुंबईभरात पाठवल्या जातात. त्यातील चार एक हजार गरबी मंडळांच्या असतात. घरगुती गरबी दरवर्षी इतक्याच विकल्या जातील. परंतु मंडळांकडून येणारी मागणी मात्र कमी झाली,’ असे ‘सुनीता पोटरी’चे चेतन चौहान यांनी सांगितले. यात मुंबईतील रस्त्यावर गरबी विकणाऱ्याचे मोठे नुकसान आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या मते, आमच्याकडून घाऊक माल घेऊन अंधेरी, बोरिवली भागात बरेच विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करतात. अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याने विक्रीचा पेच त्यांच्यापुढे आहे.

‘ठप्प झालेला व्यवसाय आता कुठे सुरळीत होऊ लागला आहे. तरीही म्हणावा इतका प्रतिसाद नाही. परंतु अजून १० दिवस हातात असल्याने दरवर्षीसारखीच विक्री होईल असे वाटते,’ अशी प्रतिक्रिया धारावीतील ‘साधना क्राफ्ट’चे धर्मेश मारू यांनी दिली. तसेच वर्षभरातील सर्वात मोठा व्यवसाय दिवाळीच्या काळात होतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत वातावरण निवळावे अशी आशा आहे. अन्यथा आमच्यावरही उपासमार ओढवेल, असेही त्यांनी नमूद केले.

हीच परिस्थिती मुंबईत ठिकठिकाणी मातीच्या वस्तूंची घाऊक विक्री करणाऱ्यांची आहे. माटुंग्यातील सुरेश प्रजापती सांगतात, ‘साधारण या काळात गरबींची विक्री करून आम्ही निवांत असतो. परंतु यंदा ठरलेला ग्राहकवर्गही फिरकला नाही.’ अद्याप मंदिरे खुली झाली नसल्याने काही लोक पूजा करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.

‘गरबी’ काय आहे?

गुजराती समाजात नवरात्रीत देवीचे प्रतीक म्हणून मातीचे नक्षीदार भांडे पूजले जाते. त्यात नऊ दिवस दिवा लावून देवीची आराधना केली जाते. नवव्या दिवशी त्यात अन्नधान्य, गोडाचे पदार्थ ठेवून ते गरबी देवीच्या मंदिरात किंवा ज्या मंडळात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे अशा ठिकाणी नेले जातात. त्यानंतर एकत्र येऊन त्या गरबींचे विसर्जन केले जाते. घरगुती गरबी १५० ते ५०० रुपयांच्या आसपास तर मंडळाच्या मोठय़ा गरबी १ हजार ते ५ हजारांच्या दारात उपलब्ध आहेत.