करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर प्रथमच राज्यातील वीज मागणीने १९ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला असून त्यामुळे जनजीवन व उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मार्चमध्ये करोनाच्या साथीमुळे देशव्यापी टाळेबंदी लागल्यानंतर जनजीवन व अर्थव्यवहार ठप्प झाले. जूनपासून शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. पण तिचा वेग कमी होता. दसरा-दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच बाजारपेठांमध्ये गर्दी दिसली. एकीकडे त्या गर्दीमुळे पुन्हा करोनाची लाट येण्याची व पुन्हा निर्बंधांची चर्चा सुरू झाली, तर दुसरीकडे या आठवडय़ात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी असे सलग तीन दिवस दिवसभर वीज मागणी १८ हजार मेगावॉटपेक्षा अधिक होती. तसेच काही तासांसाठी राज्यातील वीज मागणीने १९ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला. करोनाच्या टाळेबंदीनंतर प्रथमच अशा पद्धतीने सलग वीज मागणी नोंदवली गेली आहे.

राज्यातील वीज मागणीने १८ हजार व १९ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडणे याचा अर्थ उद्योग आणि व्यवसाय आता पुन्हा पूर्वपदावर येत आहेत असा होतो. घरगुती वीज मागणीच्या जोरावर राज्यातील वीज मागणी हा टप्पा ओलांडू शकत नाही. त्यामुळे दसरा-दिवाळीनंतर आता जनजीवनाबरोबरच उद्योग-व्यवसायही पूर्ववत होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

राज्यातील वीज मागणीने हा टप्पा ओलांडल्याने अर्थव्यवहार पुन्हा पूर्ववत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही चांगली बाब आहे. आता राज्यातील घरगुती व इतर सर्व वीज ग्राहकांनी आपल्या वीज वापरानुसार वीज बिले भरून राज्यातील वीज मागणी भागवण्यासाठी महावितरणला आर्थिकदृष्टय़ा सक्षम ठेवावे, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी नमूद केले.