शास्त्रीय संगीतामधील योगदानासाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार निवड समितीची बठक मंत्रालयात पार पडली. त्यात ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे नाव निश्चित करण्यात आले. नाव निश्चित झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांनी दूरध्वनीवरून प्रभा अत्रे यांचे अभिनंदन केले. ३ व ४ डिसेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन शास्त्रीय संगीत महोत्सवात हा पुरस्कार प्रभा अत्रे यांना प्रदान केला जाईल. ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी हा पुरस्कार किशोरी आमोणकर आणि पंडित जसराज यांना देण्यात आला आहे.  अत्रे यांनी पं. सुरेशबाबू माने व हिराबाई बडोदेकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. वयाच्या आठव्या वर्षी त्या गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. ख्याल गायकी सोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाटय़संगीत, भजन व भावसंगीत गायकीवर त्यांचे प्रभुत्व आहे.

शास्त्रीय संगीतात आजवर मी जी काही साधना केली, त्या साधनेचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार माझे गुरू, आई-वडील आणि माझ्या श्रोत्यांचाही आहे. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार असल्याने त्याचे महत्त्व विशेष आहे. – प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका