मालेगाव येथे २००८ साली झालेल्या स्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग हिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले असून ही शस्त्रक्रिया मुंबईत करायची वा भोपाळमध्ये करायची? अशी विचारणा न्यायालयाने तिला केली आहे. प्रज्ञा सिंग सध्या भोपाळ येथील तुरुंगात आहे.
न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांच्यापुढे प्रज्ञा सिंगच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. जामीन अर्जात तिने आजारपणामुळे जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. सुनावणीच्या वेळेस तिचे वकील महेश जेठमलानी आणि गणेश सोवनी यांनी तिच्यावर सध्या भोपाळमधील जवाहरलाल नेहरू कर्करोग रुग्णालयात उपचार सुरू असून तेथेच तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याचे न्यायालयाला सांगितले. तिच्यावर तेथे किंवा मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले जात असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्रज्ञा सिंगनेच तिला कुठे ही शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे हे १८ जानेवारीपर्यंत कळवावे, असे आदेश दिले.  त्याआधी विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी तिच्यावर टाटा कर्करोग रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) काहीच आक्षेप नसल्याचे न्यायालयाला सांगितले. गेल्या वर्षी प्रज्ञा सिंगला मुंबईहून भोपाळ येथे नेण्यात आले होते.