मुदतवाढ नाकारल्याने शिवसेनेची कोंडी; राज्यपालांकडून राष्ट्रवादीला निमंत्रण

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली. यामुळे सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच असून, राज्याची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू आहे.

भाजपच्या नकारानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची शिवसेनेची योजना होती. यानुसार प्रयत्न सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही झाली. काँग्रेसने पाठिंबा द्यावा, यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. शिवसेनेने आधी मोदी सरकारमधून बाहेर पडावे, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अट होती. त्यानुसार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही सादर केला.

सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची होती. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास काँग्रेसमध्येच विरोध झाला. राज्यातील नेते आणि आमदारांनी बिगरभाजप सरकार सत्तेत यावे म्हणून आग्रह धरला होता. काँग्रेसमध्ये यावरून दोन गट पडले. कोणताही निर्णय घ्यायचा नसल्यास शेवटपर्यंत घोळ घालण्याची काँग्रेसची जुनी प्रथा परंपरा आहे. त्यानुसार सायंकाळी साडेसातच्या आधी पत्र पोहोचणे आवश्यक असताना, असे कोणतेही पत्र सादर करण्यात आले नाही. परिणामी सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेची कोंडी झाली. काँग्रेसचे पत्र नसल्याने राष्ट्रवादीनेही पाठिंब्याचे पत्र दिले नाही. परिणामी शिवसेनेच्या ५६ आणि आठ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचेच पत्र राज्यपालांना सादर करण्यात आले. एवढय़ा संख्याबळाच्या आधारे शिवसेनेचे सरकार स्थापण्याचा दावा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्य केला नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तत्वत सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला असून, त्यांच्याशी चर्चा करायची असल्याने दोन दिवसांची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती शिवसेनेने राज्यपालांकडे केली. मात्र, ती नाकारण्यात आल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा न मिळाल्याने शिवसेनेचे सत्तास्थापनेचे प्रयत्न असफल ठरले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा चर्चा होणार असून, पाठिंब्याबाबत लवकरच एकत्रित निर्णय होईल, असे ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

राज्यपालांनी शिवसेनेला रविवारी सायंकाळी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते. सत्ता स्थापनेसाठी १४५ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असून त्यादृष्टीने पाठिंब्याची पत्रे सादर करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा अवधी दिला होता.

शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सुरु असलेल्या चर्चेला रविवारी सायंकाळपासूनच गती आली. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अनिल देसाई आदी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास राजभवनावर जाऊन थडकले. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्वत पाठिंबा मिळाला असल्याचे नमूद करुन सत्तास्थापनेचा दावा सादर केला आणि पाठिंब्याची पत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याच्या पत्रांची वाट पाहत शिवसेना नेते सुमारे पाऊण तास राजभवनावर ताटकळत होते. पण पत्रे न आल्याने अखेर शिवसेना नेते राजभवनातून बाहेर पडले. भाजपला दोन दिवसांचा अवधी दिला असताना राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी केवळ २४ तासांची मुदत दिली आणि मुदतवाढही नाकारली, असा शिवसेनेचा आक्षेप होता.

पवार- उद्धव भेट

काँग्रेसमध्ये नवी दिल्लीत दिवसभर बैठकांचे सत्र सुरू असताना मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दिवसभर चर्चा सुरू होत्या. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वांद्रे येथील ताज लँड्स एन्डमध्ये भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीपद देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव असून, किमान समान कार्यक्रम तयार करण्याची तयारी पक्षाने दर्शविली होती. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र येईल, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपेक्षा होती. पण हे पत्रच आलेच नाही.

सत्तास्थापनेचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस करणार?

राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणानुसार राष्ट्रवादी सरकार स्थापण्याचा दावा करणार का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अर्थात, यासाठी शिवसेनेला पाठिंब्यासाठी राजी करावे लागेल. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला मंगळवारी रात्री ८.३० पर्यंत सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी वेळ दिली आहे. राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात काँग्रेसला काही अडचण येणार नाही.

काँग्रेसचे पाठिंब्याचे पत्र विसंवादात अडकले

शिवसेनेने पाठिंब्यासाठी थेट आणि निसंदिग्ध प्रस्ताव न पाठवल्याने तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचा अंदाज न आल्याने काँग्रेसने सोमवारी शिवसेनेला पाठिंब्याचे लेखी पत्र पाठवले नसल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या पाठिंब्याअभावी शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा डाव उधळला गेला.  या नव्या घडामोडींमुळे काँग्रेसने मंगळवारी सकाळी सुकाणू समितीची बठक घेण्याचा निर्णय घेतला.