वाहनांना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

अंधेरी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर खासगी गाडी थेट घुसल्याची घटना दोन वेळा घडल्यानंतर त्यातून धडा घेत पश्चिम रेल्वेने आता स्थानकांच्या प्रवेशद्वाराजवळ गाडय़ांसाठीचे अडथळे उभे केले आहेत.

अंधेरी, मालाड, कांदिवली, मीरा रोड, वसई आणि विरार या स्थानकांच्या प्रवेशद्वाराशी असे संरक्षक अडथळे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकांमध्ये जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने गाडय़ा शिरणे अशक्य ठरणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.

अंधेरी स्थानकात पश्चिमेच्या दिशेने प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थेट खासगी गाडी शिरण्याचे प्रकार दोन वेळा घडले होते. सुदैवाने या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, तरीही रेल्वे सुरक्षेच्या अब्रूची लक्तरे निघाली होती. त्यातून धडा घेत पश्चिम रेल्वेने सर्व स्थानकांच्या प्रवेशद्वाराजवळ संरक्षक अडथळे बसवण्यासाठी सर्वेक्षण केले होते. त्यातील निष्कर्षांच्या आधारे विविध स्थानकांच्या प्रवेशद्वारावर संरक्षक अडथळे उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

हे संरक्षक अडथळे बसवल्यानंतर स्थानक सुरक्षेत वाढ झाली असून आता कोणताही विपरीत अपघात होणार नाही, अशी खात्री पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी व्यक्त केली आहे.