पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारला सवाल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असलेल्या सिंचन विभागाच्या ९४ निविदा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  निकटवर्तीय किंवा मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्याकरिताच हा निर्णय घेण्यात आला आहे का, असा सवाल केला.

मंत्रिपरिषदेच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत ९४ निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ८१ निविदा या विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पातील असून, १२ कोकणातील तर एक नाशिक विभागातील आहे. या निविदा रद्द करण्यामागे काही तरी काळेबेरे दिसते. आपल्या जवळच्यांना कामे देण्याकरिताच हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी शंकाही चव्हाण यांनी व्यक्त केली. निविदा रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती देण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासकीय  पत्रकात, विविध प्रकल्पांची कामे कालबद्ध मुदतीत पूर्ण केली जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. याचाच अर्थ पुन्हा निविदा मागवून आपल्या जवळच्यांना कामे देण्याचाच प्रयत्न असल्याचे सिद्ध होते, असेही चव्हाण म्हणाले.  कोकणातील निविदा रद्द करण्यामागे काही सामाजिक विशिष्ट हेतू असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. आघाडी सरकारच्या काळात सिंचनाची कामे झाली नाहीत, असा आरोप तेव्हा भाजपची मंडळी करीत.  सत्तेत येऊन दोन वर्षे होत आली तरी सिंचन क्षेत्रात काहीही प्रगती झालेली नाही, असा टोलाही मारला.