लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीत अजून अधिकृत चर्चेला अजून सुरुवात झाली नसली, तरी सेना-भाजपला अडचणीचे वाटणारे किंवा ठरणारे दोन मतदारसंघ आरपीआयच्या गळ्यात मारले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेनेकडील सातारा व भाजपकडील लातूर किंवा वर्धा आरपीआयला सोडला जाणार असल्याचे समजते.
महायुतीतील तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची पहिली बैठक मंगळवारी शिवसेनेच्या कार्यालयात झाली. त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात वातावारण तयार करण्यासाठी महागाई, भ्रष्टाचार, दलित व महिलांवरील वाढते अत्याचाराच्या विरोधात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर असे विभागीय संयुक्त मेळावे घेण्याचे ठरले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी व नंतर हे मेळावे होतील, असे सांगण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे मेळावे होणार आहेत.
या बैठकीत जागा वाटपाची चर्चा झाली नाही, असे तीनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. आठवले यांनी लोकसभेच्या तीन व राज्यसभेची एक जागा मागितली असली, तरी लोकसभेच्या दोन जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक सेनेकडून व एक भाजपकडून मिळेल. परंतु दोन्ही पक्ष त्यांना अडचणीच्या वाटणाऱ्या जागाच आरपीआयच्या गळ्यात मारण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवेसनेकडील सातारा आणि भाजपकडील लातूर किंवा वर्धा यांपैकी एक, अशा दोन जागा आरपीआयला देण्यात येतील, असे सांगितले जाते. आठवलेंच्या राज्यसभेच्या खासदारकीबाबत अजून तरी साशंकताच असल्याचे बोलले जात आहे.