|| निलेश अडसूळ

रंगभूमीवर नव्याने आलेल्या आणि ‘अद्वैत थिएटर’ निर्मित व ‘झी मराठी’ प्रस्तुत ‘इब्लिस’ या नाटकाचे शीर्षक ‘इबलिस’ या आगामी मराठी चित्रपटावरून चोरल्याचा दावा ‘बंदुक्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी केला आहे. या संदर्भात चौधरी यांनी नाटकाचे लेखक, निर्माते आणि झी मराठी यांना नोटीस पाठवली असून नुकसान भरपाईचा दावाही केला आहे.

राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा मानकरी ठरलेल्या ‘बंदुक्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी ‘इबलिस’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र चित्रपटाचे शीर्षक ‘इब्लिस’ या नाटकाशी जुळणारे असल्याने त्यांची शीर्षकाच्या स्वामित्व हक्काचा भंग झाल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. २०१७ मध्ये चित्रपट महामंडळाकडे आपल्या या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची नोंद के ली होती. त्यानुसार २०१८ला चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊ न चित्रपटला महामंडळाचे परिनिरीक्षण प्रमाणपत्रही मिळाले. गेले काही दिवस ते चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विविध प्रकाशकांना भेटत आहेत. या दरम्यान ‘झी’ समूहाशी संपर्क  साधला.

‘झी मराठी’च्या नियमांनुसार त्यांनी दोन वेळा या चित्रपटाचे प्रक्षेपण संबंधितांसमोर केले. ‘झी’ समूहाकडून उत्तराच्या प्रतीक्षेत असतानाच चौधरी यांना ‘इब्लिस’ नाटक रंगभूमीवर येत असल्याचे समजले. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांच्याशी संपर्क  साधला, परंतु भंडारे यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. चौधरी यांनी नाटकाचे लेखक मिलिंद शिंत्रे आणि ‘झी मराठी’चे निलेश मयेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला. परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असे चौधरी यांचे म्हणणे आहे. चित्रपट आणि नाटकाचा आशय वेगळा असला तरी सारख्या शीर्षकाचा फटका चित्रपटाला बसणार असल्याची भीती आहे. म्हणून कायदेशीर कारवाई करत ‘इबलिस’ चित्रपटाच्या नुकसान भरपाईसाठी पाच कोटी रुपयांचा दावा चित्रपट दिग्दर्शक राहुल चौधरी यांनी केला आहे.

या वादाविषयी ‘इब्लिस’चे निर्माते राहुल भंडारे यांना विचारले असता, ‘नाटक आणि चित्रपट ही माध्यमे वेगळी आहेत. आजवर एकाच शीर्षकाचे अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका येऊ न गेल्या आहेत. आशय सारखा असता किंवा माध्यम एक असते तर वाद निर्माण झाला असता. पण तसे या प्रकरणात काहीच नाही. चित्रपट दिग्दर्शकाला तशी शंका असल्यास त्यांनी थेट परिनिरीक्षण मंडळाशी संपर्क  साधावा,’ असे नाटय़ निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले.