मुंबई : ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाची सद्य:स्थिती आणि प्रगतीची दिशा यांचा वेध घेतला जाणार आहे.

या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

सोमवार, २६ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत कृषी, पायाभूत सुविधा आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रगतीचा ऊहापोह केला जाणार आहे. विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा विकासांची दिशा, महानगरांचे व त्याच्या परिघावरील प्रदेशाचे नियोजन यावर यात विचारमंथन होईल.

या सत्रात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, मुंबई महानगरासह त्याच्या आसपासच्या परिसराच्या विकासाची रूपरेखा ठरवणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी, मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम करणाऱ्या मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि नियोजनतज्ज्ञ विद्याधर फाटक हे पायाभूत क्षेत्रात काम करणारे सनदी अधिकारी राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्राच्या वाटचालीचा आढावा घेणार आहेत.

प्रायोजक..

लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र या उपक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, एसआरए, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, म्हाडा यांचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास या विषयांतील संबंधितांनी  events.loksatta@expressindia.com या ई-मेलवर नावे नोंदवावीत. निवडक इच्छुकांनाच कार्यक्रमात प्रवेश देण्यात येईल.