नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येचा जोरदार निषेध करत विविध संस्था, बँक, विमा व शासकीय कर्मचारी संघटनांबरोबरच डावी आघाडी, विद्यार्थी संघटनांनी बुधवारी सायंकाळी चर्चगेट रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला. दाभोलकर हत्येविरोधातील निषेधाच्या एल्गारासह कार्यकर्ते आणि नेते यांनी राज्यातील आघाडी सरकारचा धिक्कार केला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक मंजूर करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
डॉ. दाभोलकर यांची हत्येचा प्रत्येकजण आपापल्या परीने निषेध करत आहे. या निषेधाचा सामूहिक आविष्कार बुधवारी चर्चगेट येथे घडला. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लोकजनशक्ती पार्टी, डावी आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन, आत्मभान संघटना, डेमॉक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय),मल्याळम प्रचार संघम यासह इतर संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. महाराष्ट्र स्टेट बॅक एम्प्लॉईज फेडेरशनचे सरचिटणीस विश्वास उटगी, ‘शेकाप’चे आमदार जयंत पाटील, कॉ. जी. एल. रेड्डी, जनता दलचे (धर्मनिरपेक्ष) प्रभाकर नारकर, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, सरकारी कर्मचारी संघटनचे नेते र. ग. कर्णिक, दत्ता इस्वलकर आदी या वेळी उपस्थित होते.
दादर स्थानकाच्या बाहेर स्वामीनारायण मंदिराच्या चौकात ‘आपली मुंबई’ या संस्थेने निषेध आंदोलन केले. विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले ‘दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करा’, ‘जादुटोणा विरोधी विधेयकाला मंजुरी मिळालीच पाहिजे’, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’ अशा घोषवाक्यांचे फलक झळकावत या कार्यकर्त्यांनी सरकार आणि पोलीस यंत्रणांना धारेवर धरले. निषेध आंदोलनाच्या अखेरीस दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.