ऐरोली येथील पटनी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या आसाराम बापू यांच्या सत्संग सोहळ्यात होणाऱ्या धुळवडीच्या कार्यक्रमास विरोध करण्यासाठी आलेले रिपब्लिकन युवक आघाडीच्या कार्यकर्ते आणि बापूंच्या भक्तांमध्ये सोमवारी सायंकाळी जोरदार हाणामारी झाली. आसाराम बापूंविरोधात घोषणा देणाऱ्या रिपब्लिकन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बापूंच्या भक्तांनी चोप दिला. या हाणामारीचे चित्रीकरण करणाऱ्या दूरचित्रवाणीच्या पत्रकारांनाही मारहाण झाली.
 नवी मुंबई महापालिकेने या सोहळ्यासाठी टँकरचा पुरवठा करण्यास नकार दिल्यानंतर आयोजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याची जोडणी घेऊन हजारो लिटर पाण्याची उधळण केली. बापूंच्या भक्तांनी ऐरोली येथील भल्या मोठय़ा पटनी मैदानात होळी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. राज्यभर दुष्काळ असताना अशाप्रकारे पाण्याची उधळण करणाऱ्या सोहळ्यास विरोध करण्यासाठी रिपब्लिकन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुपारी तीनपासूनच मोर्चेबांधणी केली होती. मंडपात तयार करण्यात आलेल्या रेल्वेगाडीतून आसाराम बापू निघताच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मंडपाबाहेर नेमके काय होते आहे, याचा थांगपत्ता नसलेल्या बापूंच्या भक्तगणांनी सुरुवातीला या कार्यकर्त्यांकडे कानाडोळा केला. मात्र, घोषणाबाजीचा आवाज वाढताच काही भक्तांनी  या कार्यकर्त्यांवर चाल करत त्यांना बेदम चोप दिला. चार वाजण्याच्या सुमारास पटणी मैदानावर सुरू असलेल्या या हाणामारीचे चित्रीकरण करण्यासाठी सरसावलेल्या काही पत्रकारांनाही बापूंच्या भक्तांनी मारहाण केली. या हाणामारीत दोघे पत्रकार जखमी झाल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. दरम्यान, पोलीस व घटनास्थळी हजर असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. बापूंच्या तिघा भक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपायुक्त कराड यांनी स्पष्ट केले.