फ्रान्सच्या अध्यक्षांना काळे झेंडे दाखविणार
अणुऊर्जाच घातक असून नुकसानभरपाई वाढविण्यासाठी जैतापूर प्रकल्पाला विरोध नव्हता, असे स्पष्ट करीत ‘माडबन, जैतापूर, मीठगवाणे पंचक्रोशी संघर्ष समिती’ आणि ‘माडबन जनहित सेवा समिती’ने फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या शुक्रवारच्या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत आझाद मैदानावर काळे झेंडे दाखविण्याचे जाहीर केले आहे.
अणुऊर्जा प्रकल्पाचे दुष्परिणाम अनेक ठिकाणी दिसून आले असून त्याऐवजी सौरऊर्जा किंवा अन्य स्त्रोतांमधून ऊर्जानिर्मिती वाढवावी. नुकसान भरपाई वाढवून मिळावी, यासाठी आम्ही आंदोलने केली नाहीत. त्यामुळे आता भरपाईत वाढ केली असली तरी प्रकल्पाला विरोध कायम आहे, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे आणि समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. फ्रान्सच्या अरेवा कंपनीने जैतापूर प्रकल्पातील सहभाग काढून घ्यावा, अशा मागणीचे निवेदन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना समिती पाठविणार आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष भारतभेटीवर असून फ्रान्समध्ये नाकारलेला अणुऊर्जा प्रकल्प येथे आणणे, हे लाजिरवाणे असल्याचे वाघधरे म्हणाले. प्रकल्पासाठी घातलेल्या ३५ अटींचा भंग सुरु असून सहा बोअर विहिरी खोदून त्याचे पाणी वापरण्यात येत आहे. स्थानिक वनस्पतींची लागवड करण्याऐवजी ऑस्ट्रेलियन कॉकेशस व अन्य जातींच्या वनस्पती लावण्यात येत आहेत. कंपनीकडून अटींचा भंग होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.