साहित्याला मागणी नसल्याने प्रकाशक, लेखकही उदासीन

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : चंदू, गोटय़ापासून फास्टर फेणे, बिपीन बुकलवार या नायकांनी किशोर वाङ्मय वाचनाची अलीकडच्या काळापर्यंत तयार केलेली असोशी हरवून गेली असून आजच्या किशोरवयीन पिढीला आपलेसे वाटेल, असे साहित्य ही मराठीत दुर्लभ बाब बनली आहे.

इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि तंत्रज्ञानाकडे आकृष्ट झालेल्या आजच्या पिढीचा कल मराठी वाचनाकडे कमी असल्याने मराठी साहित्यिकांमध्ये आणि प्रकाशकांमध्ये किशोर वाङ्मयाच्या निर्मितीबाबत उदासीनता आहे.

ऐंशीच्या दशकात भा. रा. भागवत यांनी सुरू के लेल्या पुस्तकमालिके तील ‘फास्टर फे णे’च्या रूपाने मराठी किशोर वाङ्मयाला नायक मिळाला, पण बदलत्या पिढीला आपलासा वाटेल असा एखादा नवा नायक मराठी किशोर वाङ्मयात निर्माण होऊ शकला नाही.

साहसकथा, प्रेरणादायी कथा, विज्ञानकथा, तंत्रस्नेही संदर्भ ही आजच्या किशोरवयीनांची गरज आहे. शिवाय सतत मूल्यसंस्कार करणाऱ्या भाषेला आजची पिढी जुमानत नाही. त्यामुळे नेमकी गरज लक्षात घेऊन वाङ्मयनिर्मिती होण्याची गरज आहे. अशात सत्यजित रे यांचा

‘फे लुदा’,  जे. के . रोलिंग यांचा ‘हॅरी पॉटर’ मुलांना भुरळ घालत आहे; पण हे नायक आपल्या भूमीतील नसून अनुवादित आहेत. मराठीत स्वतंत्रपणे साहित्यनिर्मितीचा दुष्काळच आहे.

‘‘कि शोर वाङ्मय निर्माण करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या प्रतिभेची गरज असते. मोठे साहित्यिक किशोर वाङ्मयाला दुय्यम लेखत असल्याने मराठीत किशोर वाङ्मयाची आवर्जून निर्मिती होत नाही. आशय आणि आविष्काराबाबत प्रत्येक पिढीची वाचनाची गरज वेगळी असते. आताच्या पिढीशी थेट संवाद साधणाऱ्या साहित्याची निर्मिती व्हायला हवी. बंगाली साहित्यात तसे प्रयत्न होतात. आम्ही शाळेत असताना ‘गोटय़ा’, ‘चंदू’, ‘फास्टर फे णे’ अशी पुस्तके  वाचायचो. त्यातील पात्रे आम्हाला आमचे मित्र वाटत; पण त्या पात्रांभोवती रंगवलेले वातावरण सध्याच्या काळानुसार जुने झाले आहे. सध्या मुलांमध्ये दृक्-श्राव्य माध्यमांचे आकर्षण वाढते आहे. त्याचे तोटेही आपल्यासमोर आहेत. त्यामुळे मुलांना वाचनाकडे वळवण्यासाठी उत्तम निर्मिती झाली पाहिजे,’’ असे मत राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी व्यक्त के ले.

‘‘मुले पुस्तके  वाचत नाहीत म्हणून ती प्रकाशित करू नयेत, हे पटत नाही. स्वत:ची जबाबदारी ओळखून आम्ही किशोर वाङ्मय प्रयत्नपूर्वक प्रकाशित करत आहोत. किशोरगटातील मुलांसाठी असलेल्या पुस्तकांवर २०१० पासून विशिष्ट बोधचिन्ह लावायला सुरुवात के ली. त्यामुळे शिक्षक, पालकांना ही पुस्तके  ओळखता येतात,’’ अशी माहिती रोहन प्रकाशनच्या रोहन चंपानेरकर यांनी दिली.

‘‘मिलिंद बोकील यांचे ‘शाळा’ आणि प्रकाश नारायण संत यांची पुस्तके  किशोरगटाला आकर्षित करणारी आहेत. मात्र त्यांचे लेखन विशेषकरून किशोरगटासाठी नाही. त्याचा वाचकवर्ग सर्वच वयोगटांतील आहे. सध्याच्या पिढीसाठी इंटरनेटवर माहितीचा खजिना उपलब्ध आहे. त्यांचे बदलेले विश्व, त्यातील तंत्रस्नेही संदर्भ साहित्यात उतरवणे हे लेखकांसाठी आव्हान आहे,’’ असे मौज प्रकाशनच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी सांगितले.

गरज काय? ऑनलाइन शिक्षणामुळे वाढलेल्या स्क्रीनटाइमवर पुस्तकवाचन हा उतारा ठरू शकतो. मात्र, या मुलांना आपलेसे वाटेल असे नवे साहित्यच मराठीत फारसे नाही. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्यांचे मराठी भाषाज्ञान आणि वाचनवेग वाढविण्यासाठी मराठी किशोर वाङ्मय उपयुक्त ठरू शकते; पण आजच्या युवा-किशोर पिढीला आवडेल, अशा साहित्याची कमतरता जाणवत आहे.

इंग्रजी माध्यमाचा परिणाम

सध्याची पिढी इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने मराठी वाचन कमी झाले आहे, असेही प्रकाशकांचे निरीक्षण आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी साहित्य आकर्षित करते अशीही स्थिती नाही. आजच्या पिढीचे एकू णच वाचन कमी आहे; पण वाचायचेच असेल तर त्यांचा कल इंग्रजी पुस्तकांकडे असतो. मराठी साहित्यावर काही प्रमाणात बोलीभाषेचा प्रभावही असतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्यांना मराठी साहित्यातील विविधांगी भाषा आत्मसात करणे सोपे जाते. तसे इंग्रजीत शिकणाऱ्या मुलांबाबत होत नाही. शिवाय मराठी साहित्यातील वातावरण आणि इंग्रजी शाळांतील बहुभाषिक वातावरण यांतही फरक आहे.

पुस्तके  न खपण्याच्या भीतीने लेखक लिहीत नाहीत आणि ते लिहीत नाहीत म्हणून मुले वाचत नाहीत. सध्याच्या किशोरवयीन पिढीसमोर समाजमाध्यमे, व्हिडीओ गेम्स अशी अनेक आकर्षणे आहेत. त्यामुळे पाठय़पुस्तकांपलीकडे हा वयोगट फारसे काही वाचत नाही. पुस्तके  खरेदी करू शकणाऱ्या पालकांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने ते मराठी पुस्तके  खरेदी करत नाहीत. तसेच मराठीतील सध्याचे किशोर वाङ्मय समकालीन नसल्यानेही मुले ते वाचत नाहीत. आताच्या पिढीसाठी लेखन करायचे असेल तर ते प्रवचनात्मक असू नये. श्राव्य, ई-बुक आणि छोटय़ा स्वरूपात पुस्तके  आणली पाहिजेत.

– डॉ. वैशाली देशमुख, लेखिका

काही उपलब्ध पुस्तके 

सृष्टी-दृष्टी, वनात-जनात – अनिल अवचट

टीनएज डॉट कॉम – डॉ. वैशाली देशमुख

दौलतबंकी – बबन मिंडे

वाचा, जाणा, करा – कविता महाजन

मुलांसाठी गिर्यारोहण – उमेष झिरपे

मोहन आपटे, जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथा