इंडियन प्रिमिअर लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय सहारा पुणे वॉरियर्स संघाच्या व्यवस्थापनाने मंगळवारी घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मनमानी काराभारामुळे आपण आयपीएलमधून बाहेर पडत असल्याचे सहारा समूहाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बीसीसीआयने फ्रॅचायजीसाठीचे संपूर्ण शुल्क माफ केले, तरी आपण पुन्हा आयपीएलमध्ये परतणार नसल्याचे सहारा समूहाने स्पष्ट केले. फ्रॅंचायजींना बीसीसीआयकडून दिल्या जाणाऱया वागणुकीमुळे मनस्ताप झाल्याचे समूहाने म्हटले आहे. सहारा समूहाने २०१० मध्ये १७०० कोटी रुपयांना पुणे वॉरियर्सचा संघ विकत घेतला होता. संघ विकत घेताना देण्यात आलेले आश्वासन बीसीसीआयने पाळले नाही. फ्रॅचायजीचे शुल्क कमी करावे, यासाठी आपण सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्याकडून कोणतेच उत्तर मिळाले नाही. या सर्वामुळे आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे सहारा समूहाने निवेदनात स्पष्ट केले.