२० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या ४,८८६ वाहनांची नोंद

मुंबई : कडक निर्बंध आणि आर्थिक मंदी यांमुळे करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, तर काहींच्या वेतनात कपात झाली. असे असतानाही करोनाकाळात मुंबईत वाहन खरेदी तेजीत होती. मुंबईत अनेकांनी महागडय़ा वाहनांची खरेदी झाली असून या काळात २० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या चार हजार ८८६ वाहनांची नोंद आरटीओत झाली. मुंबईतील चार आरटीओंपैकी ताडदेव आरटीओत सर्वाधिक महागडय़ा गाडय़ांची नोंद असून तुलनेत वडाळा आरटीओत कमी नोंदणी झाली.

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओत मिळून तीन हजार ६७९ आलिशान व महागडय़ा गाडय़ांची नोंदणी झाली आहे, तर याच किमतीच्या एक हजार २०७ वाहनांची नोंदणी एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत झाली. या सर्व महागडय़ा गाडय़ांची रक्कम २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांनी सांगितले. नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर १३ टक्के  आणि त्यापेक्षा जास्त वाहन कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे चारही आरटीओच्या तिजोरीतही मोठय़ा महसुलाची भर पडली आहे.

मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती स्कोडा, फॉक्सवॅगन या वाहनांना दिली आहे. त्यापाठोपाठ मर्सिडीज, फे रारी, टोयाटो, जॅग्वार, लॅण्ड रॉवर, बीएमडब्ल्यू, पोर्शे जर्मनी, रोल्स रॉयस, ऑडी, व्हॉल्वो इत्यादी कंपन्यांच्या वाहनांच्या खरेदीकडेही मुंबईकरांचा कल आहे. एप्रिल २०२० ते जुलै २०२१ पर्यंत वडाळा आरटीओत ८९ वाहनांची नोंद झाली असून त्यात स्कोडा आणि फॉक्सवॅगन आणि टोयाटो गाडय़ांची नोंद अधिक आहे. याच कालावधीत ताडदेव आरटीओत सर्वाधिक २०१० वाहनांची नोंदणी झाली आहे. अंधेरी आरटीओमध्येही एक हजार ४६३,बोरिवली आरटीओत  १,३२४ महागडय़ा वाहनांची नोंद आहे.

कोटय़वधींचा महसूल जमा

या महागडय़ा वाहनांवर १३ टक्के  आणि त्यापेक्षा जास्त कर आकारला जातो. त्यामुळे चारही आरटीओंना या कालावधीत कोटय़वधींचा महसूल मिळाला आहे. कर आकारल्याने अंधेरी आरटीओला यामुळे तब्बल ९९ कोटी ९५ लाख रुपये मिळाले आहेत. ताडदेव आरटीओला मिळालेला कर यापेक्षा जास्त आहे. तर वडाळा आरटीओत वाहनांची नोंदणी कमी झाल्याने करापोटी मिळालेली रक्कम कमी आहे.