प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात तोफा, युद्धनौका, हवाई कसरतीही
प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा प्रथमच मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. मरिन ड्राइव्हवर हा सोहळा रंगणार असून त्यात तिन्ही संरक्षणदलांचे जवान सहभागी होणार आहेत. मात्र हा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांना सकाळी ८ पूर्वीच आपापल्या जागा पकडाव्या लागणार आहेत.
फोटो गॅलरी: प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम
मरिन ड्राइव्हवरील (सुभाषचंद्र बोस मार्ग) मरिन लाइन्स ते एनसीपीए दरम्यान हा सोहळा रंगणार आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. या सोहळ्यात आकर्षक २५ चित्ररथ, व्हिंटेज कार रॅली, मोटारसायकलस्वारांची साहसी प्रात्यक्षिके, गतिमंद आणि अंपग मुलांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. नौदल, हवाईदल आणि लष्कराचे जवानही या सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यामुळे हवाई दलाच्या दिमाखदार कसरती, युद्धनौकांच्या प्रतिकृती, बोफोर्स तोफा, कॅचर रडार, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे नागरिकांना पाहता येणार आहेत.
प्रजासत्ताकदिन संचलनात मुंबईच्या शिल्पकारांना पालिकेचा प्रणाम!
कार्यक्रमाच्या ठिकाणी १० हजार लोकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणि गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सकाळी ८ पूर्वीच पोहोचण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसाळकर यांनी केले आहे. नागरिकांनी शक्यतो लोकलनेच यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल
* मरिन ड्राइव्ह दुपारी २ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद.
* सोहळ्यासाठी येणाऱ्यांनी लोकलचाच वापर करण्याचे आवाहन
* दक्षिणेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी रफी अहमद किडवाई मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा वापर करावा.
* एअर इंडिया जंक्शनजवळ सोहळ्याच्या ठिकाणी पासधारकांनाच प्रवेश
* वाळकेश्वर, डॉ.अ‍ॅनी बेझंट रोड, पेडर रोड वाहनचालकांना ठरावीक ठिकाणी खुला.
* मादाम कामा रोड वाहनांसाठी बंद

कडेकोट सुरक्षा
– या सोहळ्याच्या सुरक्षेची तयारी १० दिवसांपासून सुरू आहे.
– अतिरिक्त पोलीस आयुक्त, चार पोलीस उपायुक्त आणि २ हजार पोलीस कर्मचारी तैनात
– शीघ्र कृती दल, फोर्स वन, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथकाची गस्त